राधानगरी तालुक्याला काल रात्रीपासून संततधार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तिन्ही धरणक्षेत्रात मुसळधार वृष्टी झाल्याने नद्यांची पाणी पातळी वाढून वहातूक विस्कळीत झाली आहे.
तालुक्याच्या सर्वच भागात रात्रभर मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. राधानगरी – कोकण मार्गावर दाजीपूर नजीक पठाण पुल येथे झाड कोसळल्याने वहातूक काही काळ ठप्प झाली होती.
राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ( सकाळी सहा वाजेपर्यंत ) तब्बल १९४ मिलीमिटर्स वृष्टी झाली. तुळशी धरण क्षेत्रात सकाळी सहा ते दुपारी एक पर्यत २२३ मिलीमिटर्स एवढा विक्रमी पाऊस झाला आहे.
काळम्मावाडी धरण क्षेत्रात ६६ मिलीमिटर्स पाऊस झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १४३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
तालुक्यात ओढया नाल्यांचे पाणी पिकात घुसले आहे. अनेक ठिकाणी जमीनीं तुटून जाऊन पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कोल्हापूर – राधानगरी मार्गावर घोटवडे, परिते, हळदी, कुरूकली आदी ठिकाणी पाणी आले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पडळी पुलावर पाणी आल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.
पावसाच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदीकाठची पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले असून परिते येथे के.एस.बरगे यांच्या राईस मिलमध्ये पाणी घुसल्यामुळे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : खारघर धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका
https://youtu.be/6QTCiJ2brJI