कोल्हापूर

कोल्हापूर : रूकडीत भंडारा उचलून धनगर समाजाने घेतली एकोप्याची शपथ

मोहन कारंडे

इचलकरंजी; संदीप बिडकर : रुकडी (ता. हातकणंगले) येथे धनगर समाजावर बहिष्कार घालण्याच्या प्रकारास दै. 'पुढारी'ने वाचा फोडल्यानंतर राज्यभरातील राजकीय, सामाजिक यंत्रणा हादरून गेली. सोमवारी दिवसभर जिल्ह्यात याचीच चर्चा होती. या विषयावर तोडगा काढण्यासाठी खा. धैर्यशील माने यांनी धनगर समाजातील दोन्ही गटांची बैठक बोलावली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीनंतर अन्याय झालेल्या समाजाला हक्क देण्याच्या कबुलीनंतर यावर तोडगा निघाला.

खा. माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावून दोन्ही गटांतील लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन सामाजिक जाणिवेतून प्रसंगी रागावून, समजावून यशस्वी शिष्टाई करीत तब्बल चार तासांनंतर धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा मंदिरात भंडारा उचलून शपथ देऊन हा वाद मिटल्याचे जाहीर केले. यावेळी हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, निवासी नायब तहसीलदार दिगंबर सानप, मंडल अधिकारी गौरव कनवाडकर आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

  • धक्कादायक! रूकडीत २८ वर्षे धनगर कुटुंबांवर बहिष्कार, 'ती'ने घरातच खड्डा खणून पतीचे केले अंत्यसंस्कार

    राजर्षी शाहू कला वाणिज्य महाविद्यालयात सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली. बहिष्कार टाकलेल्या धनगर कुटुंबातील व्यक्तींनी प्रशासनासमोर व्यथा मांडली. यावेळी म्हापू शिणगारे म्हणाले, मला 25 वर्षे वाळीत टाकले आहे. काशिनाथ केरबा शिणगारे म्हणाले, मला व कुटुंबाला 28 वर्षे वाळीत टाकले आहे. बाजीराव शिणगारे म्हणाले, वाळीत टाकलेल्या लोकांशी बोलल्यामुळे मला समाजाने वाळीत टाकले. यावेळी अनेकांनी व्यथा मांडली. दुसर्‍या बाजूकडूनही याबाबत सविस्तर माहिती दिली. समाजातील अनेकांनी वर्गणी दिली नाही. तरीही समाजाचे प्रमुख काशिनाथ शिणगारे यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत कार्य केले. यामध्ये दोन्ही गटांकडून मंदिरातील पूजेचा मान व देवस्थान जमिनीतील उत्पन्नावरून जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही गटांतील तरुण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर खा. धैर्यशील माने यांनी स्वतः उतरून दोन्ही गटांतील तरुणांना शांत केले.

प्रदीर्घ चर्चेनंतर खा. माने म्हणाले, दोन्ही बाजूंकडील लोकांनी मनात अढी न ठेवता सामाजिक जाणिवेतून एकत्र काम करणे गरजेचे आहे. सामाजिक बहिष्कार खपवून घेणार नाही. माझ्या गावात हे होता कामा नये. तुम्ही सर्व एका रक्तामासाचे आहात. एकोप्याने राहा, मी तुमच्या पाठीशी आहे. त्यानंतर जमाव शांत झाला. मंदिर पूजा व देवस्थान जमीन बाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये काशिनाथ शिणगारे यांनी मंदिर बांधकाम पूर्ण करून समाजाचे नेतृत्व करण्याचे सर्वांनुमते ठरले. तसेच मंदिर पूजा-अर्चा, मान व दुसर्‍या गटातील लोकांना देवस्थानची जमीन हिश्श्यानुसार शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत वाटून देण्याचे ठरले.

त्यानंतर हा वाद मिटल्याचे खा. माने यांनी जाहीर केले, पण धनगर समाजाने बिरोबा मंदिरात शपथ घेण्याचा आग्रह धरला… मग सर्व समाजाबरोबर खा. धैर्यशील माने यांनी बिरोबा मंदिरात येऊन शपथ दिली. सर्वांची गळाभेट होऊन हा वाद मिटला.
यावेळी सरपंच रफिक कलावंत, तंटामुक्त अध्यक्ष अमोल कुलकर्णी, उपसरपंच रणजित कदम, तलाठी सुदर्शन सोळांकुरे, सैनिक देवेंद्र शिणगारे, सर्जेराव शिणगारे, बाजीराव शिणगारे, भिकाजी शिणगारे, संताजी भोसले आदींसह धनगर बांधवांसहीत रुकडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

दै. 'पुढारी'ने फोडली वाचा

'रुकडीत 28 वर्षांपासून काही धनगर कुटुंबांवर बहिष्कार' हे वृत्त सोमवारी दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध करताच राज्यभरात खळबळ उडाली. समतेचा संदेश देणार्‍या राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यातच एखाद्या समाजावर असा बहिष्कार टाकण्यातचे पातक कसे काय घडू शकते, असे सवाल उपस्थित होऊ लागले. राज्यभरातील धनगर बांधवांमध्ये या वृत्ताचीच दिवसभर चर्चा होती. अनेकांनी थेट दूरध्वनी करून या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल दै. 'पुढारी'चे खास अभिनंदन केले.

सामाजिक न्याय विभागाचे प्रतिनिधी हजर

सामाजिक न्याय विभागाचे वतीने नंदिनी जाधव या उपस्थित होत्या. त्या दै. पुढारीची बातमी वाचून पुण्यातून रुकडीला आल्या. त्यांनी सांगितले की जात पंचायत संविधानात बसत नाही. जर कोणी करण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षा होते. मी स्वतः केस दाखल करू शकते. सामाजिक जाणीवेतून वाद मिटवा, असे त्यांनी आवाहन केले.

खा. माने जळगावहून थेट रुकडीत

खा. धैर्यशील माने हे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यात कार्यरत होते. परंतु गावातील घटनेवर तोडगा काढण्यासाठी ते कित्येक तासांचा प्रवास करून रूकडीत दाखल झाले.

चिमुरडीच्या रडण्याने उपस्थित हेलावले

सैन्यदलातील देवेंद्र शिणगारे यांची 12 वर्षाची मुलगी सायली शिणगारे बैठकीत उपस्थित होती. तिने खा. धैर्यशील माने यांना सांगितले, मी शाळेत गेली असता माझ्या वर्गातील धनगर समाजातील मुलींनी बोलणे बंद केले. तसेच त्या मैत्री करीत नाहीत, असे म्हणून ती रडू लागली हे बघून खा. मानेही गलबलून गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT