राज्‍यसभा निवडणूक : आघाडीला फितुरीचा धोका; नेत्यांची कसोटी | पुढारी

राज्‍यसभा निवडणूक : आघाडीला फितुरीचा धोका; नेत्यांची कसोटी

मुंबई; दिलीप सपाटे : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता यावेळी मावळली असून, सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक या कोल्हापूरच्या दोन पैलवानांमध्ये प्रतिष्ठेची कुस्ती रंगण्याची शक्यता आहे. या चुरशीच्या निवडणुकीचे भवितव्य हे 13 अपक्ष आणि 16 छोट्या पक्षाच्या आमदारांच्या हातात आहे. त्यामुळे घोडेबाजार रंगण्याची शक्यता असून आघाडीच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.

राज्यसभा निवडणूकीत पक्षाचा ‘व्हिप’ आमदारांवर बंधनकारक आहे. सध्या विधानसभेत निव्वळ स्वतंत्रपणे निवडणून आलेले 13 अपक्ष आमदार आहेत. तर छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत. 13 पैकी आठ अपक्षांनी महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. तसेच 16 पैकी 10 लहान पक्षांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. हे गणित पाहता महाविकास आघाडीकडे एकूण 170 आमदारांचे संख्याबळ आहे. उमेदवाराला विजयासाठी 42 मतांचा कोटा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आपले चार उमेदवार जिंकून आणण्यासाठी 168 मते आवश्यक आहेत. शिवसेना संजय राऊत यांच्या बाबत कोणताही धोका पत्करणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे चौथे उमेदवार संजय पवार हे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवार आणि धनंजय महाडिक यांच्यातच सहाव्या जागेचा सामना रंगणार हे स्पष्ट आहे.

अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवारांना महाविकास आघाडीचा व्हीप लागू होणार नाही. अपक्ष आमदार व्हीपपासून मुक्त असून छोट्या पक्षांना त्यांच्या पक्षाचा व्हीप लागू होईल. त्यामुळे हे 29 आमदार काय करतात, यावर या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे.

महाविकास आघाडीला समाजवादी (2), प्रहार (2) माकप (1), स्वाभिमानी (1) आणि शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी (1) अशा सात जणांचे मतदान होणे अपेक्षित आहे. मात्र आठ अपक्ष, बहुजन विकास आघाडीचे तीन या आमदारांची भूमिका महत्त्‍वाची ठरणार आहे. ही मते फुटणार नाहीत याची काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घ्यावी लागेल. अकरा मतांपैकी पाच-सहा मते जरी फोडण्यात भाजपला यश आले तरी महाविकास आघाडीचे गणित बिघडू शकते.

शिवसेनेकडील बच्चू कडू यांचे 2, जलसंधारण मंत्री शंकर गडाख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर हे चार आमदार असे आहेत की, ते सरकारमधे सहभागी आहेत. त्यामुळे ही चार मते नक्की मिळतील; पण उरलेल्या ११ अपक्षांपैकी कितीजण मतदान करतील ? याकडे आघाडीला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. बहुजन विकास आघाडी (3), एमआयएम (2), मनसे (1), माकप (1) यांच्या मतालाही महत्त्व आले आहे.

विधानसभेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस 44, राष्ट्रवादी 53, शिवसेना 55, भाजप 106, छोटे पक्ष 16 (बविआ 3, सपा 2, एमआयएम 2, प्रहार 2, मनसे 1, सीपीआय 1, स्वाभीमानी 1, आरएसपी 1, जनसुराज्य 1, शेकाप 1, क्रांतीकारी शेतकरी पक्ष 1 ), अपक्ष 13,

शिवसेनेच्या रमेश लटके यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त.

कोण कुठे?

महाविकास आघाडी : अबू आझमी, रईस शेख, शंकरराव गडाख, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रकांत पाटील (जळगाव), मंजुळा गावित, किशोर जोरगेवार, संजयमामा शिंदे, आशीष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, गीता जैन, बच्चू कडू, राजकुमार पटेल. देवेंद्र भुयार, हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील.

भाजप : विनय कोरे, प्रकाश आवाडे, महेश बालदी, राजेंद्र राऊत, रवी राणा, रत्नाकर गुट्टे.

Back to top button