कोल्हापूर

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

आगामी महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार आहे. कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवून शिवसेनेचा महापौर करून दाखवू, असा निर्धार संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी रविवारी व्यक्‍त केला. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीही स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेनेचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही स्वबळावर लढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. महापालिका निवडणुकीबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांचा 27 फेब्रुवारीला प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर दुपारी 4 वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास शिवसेना नेते दिवाकर रावते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्?िथत राहणार आहेत, असेही ते म्हणाले.

स्वबळाचाच आग्रह

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत दुधवडकर यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतली. बहुतांशी पदाधिकार्‍यांनी शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी मते मांडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख खा. संजय मंडलिक यांच्या उपस्िथतीत ही बैठक झाली.

दुधवडकर म्हणाले, शिवसेनेने जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक स्वबळावर लढवली, शिवसेनेचे 4 संचालक निवडून आले. त्याचप्रमाणे आता महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही शिवसेना स्वबळावरच लढेल.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आ. चंद्रदीप नरके, माजी आ. डॉ.सुजित मिणचेकर, माजी आ. सत्यजित पाटील, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, शहरप्रमुख शिवाजी जाधव, विनायक साळोखे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT