गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेसाठी गडहिंग्लज तालुक्यातून सेवा संस्था गटासाठी अखेरच्या क्षणापर्यंत संतोष पाटील यांना बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु होते. माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत संतोष पाटील हे बिनविरोध होणार अशी अटकळ असताना काही किरकोळ बाबी घडल्या अन् अप्पी पाटील यांचा अर्ज निवडणूक रिंगणात राहिला. यापूर्वीच सुरुवातीच्या टप्प्यात संतोष पाटील यांनी १०६ पैकी ८६ मतदार सहलीवर नेले होते. त्यामुळे ही लढत एकतर्फी होणार हे निश्चित होते.
गडहिंग्लजला सेवा संस्था गटात निवडणूक लागली खरी. मात्र पहिल्यांदा सोबत असलेले ८६ मतदार व त्यानंतर सत्ताधार्यांची असलेली जोडणी यामुळे तब्बल १०० मतांचा एकत्रित गठ्ठा संतोष पाटील यांच्यासोबत राहिला. अप्पी पाटील यांनीही प्राप्त परिस्थिती पाहून फारसे प्रयत्न न केल्याने त्यांना या निवडणुकीत अवघी सहा मते मिळाली. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात सेवा संस्था गटात झालेल्या एकतर्फी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतोष पाटील यांनी तब्बल १०० मतांनी विजय मिळविला.
या दोन्ही पाटलांमध्ये लढत होती. मात्र यामध्ये संतोष पाटील यांचा विजय निश्चित धरला होता. अप्पी पाटील यांची निवडणुकीची रणनीती वेगळी असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची रिस्क न घेण्याचे ठरवून मतदार बांधून ठेवण्यासाठी नियोजन केले होते. अप्पी पाटील यांनी पहिल्या टप्प्यात चाचपणी करुन काही हाताशी लागते का, हे पाहिले. त्यानंतर मात्र त्यांनी विनाकारण खर्च न करता आलेल्या परिस्थितीला सामोरे जात निवडणुकीत 'एकला चलो रे'ची पवित्रा घेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. याच कारणाने मतदानादिवशी म्हणावा तितका जल्लोष, जोश दिसून आला नाही. निकालानंतर प्रत्यक्ष आकडेवारी हाती आल्यावर तब्बल १०० मते संतोष पाटील यांना मिळाल्याने राष्ट्रवादी व सहकार्यांचे एकगठ्ठा मतदान जसेच्या तसे मिळाल्याचे दिसून आले. निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
हेही वाचलंत का?