कोल्हापूर

कासारवाडी : मादळे येथील ऐतिहासिक विहिरींची दुरवस्था

सोनाली जाधव

कासारवाडी : उत्तम वडिंगेकर
प्राचीन काळापासून कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इ. स. पू. काळातील ग्रीक रोमनचा भारताशी असलेला व्यापार. शिलाहार, भोज घराणे, मध्ययुगीन, आधुनिक ब्रिटिशकालीन इतिहासातून कोल्हापूरच्या इतिहासाचा उल्‍लेख पुराभिलेखीय आणि पुरातत्त्वीय साधनांमधून मिळतो.

1) मादळे येथे ऐतिहासिक आडाची झालेली दुरवस्था.

स्वराज्यरक्षक ताराराणी यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजांच्या आकस्मिक निधनानंतर (इ.स.1922) राजाराम महाराज (तिसरे) छत्रपती झाले. शाहू महाराजांचे समाजहिताचे कार्य त्यांनी पुढे चालवले. त्यांनी काढलेले समाजहिताचे अनेक आदेश पुराभिलेखागारात जतन केलेले आहेत. संस्थानातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आड, विहीर बांधण्याचे आदेश त्यांनी दिले. संस्थानातून त्यांच्या खर्चाची सोय केली.

मादळे येथील नष्ट होत चाललेला पाण्याचा कुंड.

मादळे (ता. करवीर) येथे पाण्याचे स्त्रोत शोधताना छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील इ.स. 1939 मधील ऐतिहासिक विहीर नुकतीच उजेडात आली. या परिसरात अजूनही दोन ते तीन पडझड झालेल्या अवस्थेतील विहिरी, आड आहेत, तर एक विहीर पूर्णत: जमिनीत गडप झाली असून, तिच्या फक्‍त खुणा दिसतात. या परिसरात अनेक ऐतिहासिक पुरातत्त्वीय वास्तू असल्याचे नागरिक सांगतात. सध्या मादळे गावची लोकसंख्या 818 आहे, तर 1939 साली लोकसंख्या किती असेल. आणि त्यासाठी इतक्या विहिरी का बांधल्या? तेथे असणारे पाण्याचे कुंड कोणाच्या काळातील? असे प्रश्‍न पडतात. यासाठी नवीन संशोधक आणि पुरातत्त्व विभागाने या परिसराचे संशोधन करणे गरजेचे आहे; पण अद्याप पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी भेट दिली नसल्याचे चित्र आहे.

हा परिसर वन विभागाच्या ताब्यात असल्याने आम्हाला तेथे काही करण्यास वन विभागाच्या परवानगीची गरज असते. यामुळे ग्रामपंचायतीला त्या परिसरात हस्तक्षेप करता येत नाही.
– मीनाक्षी जाधव, सरपंच, सादळे-मादळे

 :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT