कोल्हापूर

कसबा बावडा : महापुरात होणारी कसबा बावड्याची कोंडी कधी फुटणार?

सोनाली जाधव

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा
कसबा बावड्याला तिन्ही बाजूने पंचगंगेचा वेढा आहे. गेल्या तीन वर्षांतील 2019 व 2021 च्या महापुरात कसबा बावड्याला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या उपनगरातून शहराला जोडणारा केवळ एका कॉलनीचा रस्ता सुरू राहतो. भगवा चौक ते चार नंबर फाटकपर्यंतच्या (न्यायसंकुल) रस्त्यावर ब्रीज करण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे.

दि. 21, 22, 23 जुलै 2021 या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी 56.3 फुटापर्यंत गेली होती. गेल्या 62 वर्षांतील हा महापुराचा विक्रम समजला जात आहे. 8 ऑगस्ट 2019 रोजीच्या महापुराची पातळी 55.7 फूट राहिली. नागरिकरणाच्या अति लालसेने नदीपात्रात पाणी पसरणार्‍या सर्व क्षेत्रांमध्ये भराव टाकण्यात आला. अनैसर्गिक पद्धतीने टाकलेल्या भरावाने गेल्या तीन वर्षांत दोन वेळा महापुराने आपले रौद्ररूप दाखवले. या दोन्ही वेळा कसबा बावड्याला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. उपनगरात येण्यासाठी आणि उपनगरातून बाहेर पडण्यासाठी लाईन बाजार येथील एका कॉलनीचा एकमेव रस्ता सुरू होता. पाऊस, सततची वाहने यामुळे या रस्त्यावर प्रचंड दलदल झाली होती. यातूनच वाहनधारक मार्ग काढत होते.

उलपे मळा, वाडकर मळा, डबरा कॉलनी, आंबेडकर नगर, माळी मळा, रेडेकर मळा, बिरंजे पाणंद, शाहू सर्कल, श्रीराम कॉलनी, बी. टी. पाटील नगर, ठोंबरे मळा, रेणुका नगर, त्र्यंबोलीनगर येथील अनेक घरांमध्ये महापुराचे पाणी शिरल्यामुळे प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. घरे पडली, पशुधन गमवावे लागले, शेतीची वाताहत झाली.राजाराम बंधारा मार्गे कसबा बावड्यातून बाहेर जाणारा मार्ग होत असल्याने त्याला पर्यायी समांतर पूल बांधण्याचे काम सध्या बंद आहे. यानंतर कसबा बावडा – शिये दरम्यानच्या 100 फुटी रस्त्यावर पाणी प्रवाही असते.पंचगंगा पातळी पंचेचाळीस फुटांवर गेल्यानंतर कसबा बावडा चार नंबर फाटक मार्गे कोल्हापूर या रस्त्यावर महापुराचे पाणी येते. पाणी पातळी 52 फुटांवर गेल्यानंतर कसबा बावडा लाईन बाजारचा रस्ताही वाहतुकीसाठी बंद होतो. कसबा बावडा उपनगराच्या पूर्वेला बिरंजे पाणंद येथूनही पंचगंगेच्या महापुराचे पाणी पॅव्हेलियन ग्राऊंड जवळच्या चौकात येते. यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद होते.

सुमारे पाऊण लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या या मुख्य उपनगरात अनेक शैक्षणिक, सहकारी संस्था तसेच परिसरात शासकीय कार्यालय आहेत. शिरोली औद्योगिक वसाहत, सांगली, सातारा, पुणे, मुंबई या जिल्ह्याकडे जाणारी मोठी वाहतूक या उपनगरातून होते. हजारो वाहने दररोज मुख्य मार्गावरून धावत असतात. शहराच्या या मुख्य उपनगराची महापुरात चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी या ब्रीजचा उपयोग होणार आहे. महामार्गाचा संपर्क तुटतोकसबा बावड्यात पुराचे पाणी आल्याने कोल्हापूरचा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाशी संपर्क तुटतो. कसबा बावडा – शिये मार्गही बंद होतो. या मार्गाची उंची वाढविण्याची गरज आहे. हा मार्ग बंद झाल्याने शिरोली एमआयडीसीचा संपर्क पूर्णत: तुटतो. यामुळे कारखानदारांचेही मोठे नुकसान होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT