कोल्हापूर

‘ईडी’ने ताब्यात घेतलेल्या जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत

अविनाश सुतार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : चौकशी साठी ताब्यात घेतलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (KDCC Bank) पाच कर्मचाऱ्यांना  सक्‍तवसुली संचालनालय ( ईडी) सोडल्यानंतर कोल्हापुरात जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर 'ईडी'ने छापा टाकून ताब्यात घेतलेले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, साखर विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, बँक निरीक्षक सचिन डोणकर व राजू खाडे यांना शुक्रवारी रात्री उशिरा जबाब घेऊन सोडून दिले. हे सर्व कर्मचारी आज (दि.४) मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले.

जिल्हा बँकेचे (KDCC Bank) कर्मचारी सुनिल लाड यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'ईडी'कडून गुरुवारी चौकशी सुरू असताना लाड बँकेत होते. ३० तास ईडीकडून चौकशी सुरू होते. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी तणावाखाली आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला काही झाल्यास सर्वस्वी ईडी जबाबदार असेल, असा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या साक्षीतून कोणाची नावे पुढे येणार, याचीच शुक्रवारी जिल्हा बँक वर्तुळात चर्चा होती. बुधवारी 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह बँकेची सेनापती कापशी (ता. कागल) व हरळी (ता. गडहिंग्लज) येथील शाखांवर छापे टाकले. येथे चौकशी केली होती. जिल्हा बँकेतील तीस तासांच्या छाप्यानंतर 'ईडी'चे पथक पाच अधिकार्‍यांना ताब्‍यात घेत मुंबईला रवाना झाले होते.

पाच अधिकाऱ्यांना मुंबईला साक्षीसाठी नेल्याचे बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. अधिकार्‍यांना मुंबईला नेऊन त्यांचे जबाब नोंदवले गेले.  ७० तासांनी त्यांची सुटका केली, हे सारे अमानुष आहे. हसन मुश्रीफ हे नाव समाविष्ट करण्यासाठी 'ईडी'च्या अधिकाऱ्यांचा हा खटाटोप होता, असे पत्रक हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस दिले होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT