Kolhapur-Ratnagiri Route Expansion : आंबा ते पैजारवाडी ४५ किमी टप्पा लटकलेलाच ! file photo
कोल्हापूर

Kolhapur-Ratnagiri Route Expansion : आंबा ते पैजारवाडी ४५ किमी टप्पा लटकलेलाच !

दोन वर्षात तरी रस्त्याचे काम मार्गी लागणार का? वाढीव मुदतीचा ठेकेदारालाच लाभ..

पुढारी वृत्तसेवा

Work on the 45-km Amba-to-Paijarwadi stretch remains stalled!

सरूड : चंद्रकांत मुदूगडे

नागपूर-रत्नागिरी या प्रस्तावित विस्तारिकरण कामातील महत्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर-रत्नागिरी (एनएच १६६) मार्गावरील आंबा ते पैजारवाडी या सुमारे ४५ किमी अंतरातील रस्ता रुंदीकरण काम मोठ्या प्रमाणात रखडले आहे. नदी, ओढ्यावरील तसेच छेद रस्त्यावरचे पूलांचे काम बहुतांश थंडच आहे. एकेरी मार्गच सुस्थितीत नाहीत तेथे दुभाजक कुठून येणार. त्यामुळे अनेक जागच्या 'डायव्हर्शन'ला तोंड देत कच्च्या सेवा रस्त्यावरून वाहनांना मार्गक्रमण करावे लागत आहे. पुढील दोन वर्षात तरी हे लटकलेले काम पूर्ण होईल का? याची निश्चित शाश्वती मिळत नाही.

शाहूवाडी, पन्हाळा या दोन तालुक्यातील हा भाग अधिक पर्जन्यमानाचा आहे. पावसाळ्यातला प्रवास मोठा त्रासदायक असल्यामुळे रस्त्याच्या कामावरून प्रवाशीवर्गात नाराजीचा सूर आहे. बोरपाडळे येथे उंचीवरून बहुचर्चित ठरलेला फ्लायओव्हरसह पैजारवाडी येथील बाह्यवळण रस्ता अद्यापही प्रवाशांच्या नजरेत आलेला नाही. येथे जुन्या रस्त्यावरूनच वाहने धावत आहेत.

आवळी (बोरिवडे फाटा) येथील ब्रिज तसेच टोल प्लाझा (काम ठप्प) परिसर, भाडळे खिंड, बांबवडे बायपास अंबिरा पूल, सरूड रस्त्यावरील उड्डाणपूल ही सर्व कामे खोळंबली आहेत. बांबवडे (टर्निंग पॉईंट) ते बाजगेवाडी हा चार किमी अंतरातील रस्ता काहींसा पूर्णत्वाला गेला आहे. त्यापुढे सावे, सांबू, कोपार्डे, पेरीड, कडवे हा मलकापूर शहराला बायपास देऊन होणाऱ्या रस्त्याचे ७० टक्केहुन अधिक काम ठप्पच आहे.

मलकापूर-आंबा दरम्यानच्या रस्त्याची वेगळीच अवस्था आहे. १८ किमी टप्प्यात जुन्या एकेरी मार्गाने वाहतूक रहदारी सुरु आहे. जाधववाडी, निळे येथील पेट्रोल पंपाच्या परिसरातील रस्त्याची दिशाच स्पष्ट दिसत नाही. अर्थात कामाचा गंधही नाही. कुठेही दुभाजक नाहीत. रस्त्यासाठी बाजुचे कटिंग काम तर काही जागी मुरूम भरावाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे. वाहनांच्या वर्दळीत उडणाऱ्या धुळीच्या लोटात रस्ता हरवून जात आहे. शिवाय दुचाकी आणि लहान वाहनधारकांना हे धुळीचे साम्राज्य भेदून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे.

रखडलेल्या बायपास रस्त्यामुळे आंबा हिलस्टेशनचे व्यवसायिक गणित अद्याप तरी सावरून गेले आहे. मोकाट आणि अनियंत्रित कंत्राटदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे हे विस्तारित काम निर्धारित (डिसेंबर २०२५) मुदतीनंतर किंबहुना मंजुर वाढीव मुदतीनंतरही गती घेऊ शकलेले नाही, हे निराशाजनक वास्तव आहे. पावसाळा तोंडावर आला असताना गटारे आणि रस्त्याचे काम राखडल्यामुळे पावसाचे पाणी निर्गती अभावी मुख्य व सेवा रस्त्यावर विखूरणार आहे. बाजूलाच २० ते ४० फूट उंच कटिंग झालेल्या जागी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. याचा त्रास वाहनधारक प्रवाशांना यंदाही सहन करावा लागणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही संथगती कायम !

नागपूर-रत्नागिरी चौपदरीकरण कामातील कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे काम पर्यावरण आणि अनुषांगिक परवानगीसह काही कारणांमुळे रखडले होते. तथापि असे सर्व अडथळे दूर करून एकूण रस्ते प्रकल्पाचे काम मार्गी लावले जाईल, असे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सभागृहात महिन्याभरापूर्वी जनतेला आश्वस्त केले. मात्र, या आश्वासनानंतर आंबा ते पैजारवाडी टप्प्याच्या संथगती कामात सकारात्मक बदलाची चिन्हे अजिबात दिसत नाहीत.

डोणोली-चरण रस्त्यावर ओव्हर ब्रिजची मागणी दुर्लक्षित !

भाडळे खिंडीतून बांबवडे बाजारपेठेला वळसा घालून पुढे जाणाऱ्या या रस्त्याने डोणोलीजवळ चरण-थेरगांवकडे जाणारा रस्ता थेट छेदला आहे. पन्हाळ्याच्या अमृतनगर (वारणा) पट्ट्याशी जोडणाऱ्या या रस्त्यावर मोठी वर्दळ आहे. शिवाय शेतकऱ्यांचा राबताही आहे. भविष्यातील अपघात प्रवण क्षेत्राची भीती ओळखून परिसरतील नागरिकांनी येथे ओव्हर ब्रिजची मागणी केली होती. त्यासाठी आंदोलनही केले होते. मात्र, तरतुद नसल्याचा बाऊ करून लोकांची ही मागणी अव्हेरून ठेकेदार कंपनीने इथले काम रेटून पुढे नेले आहे. प्रत्यक्षात रस्ता सुरु झाल्यावर इथल्या लोकांना जीवाची किंमत मोजावी लागणार आहे. त्याआधी संबंधित व्यवस्था ओव्हर ब्रिजची दुर्लक्षित मागणी विचारात घेईल अशी परिसरातील नागरिकांना आशा आहे.

अडथळ्यांची शर्यत आणि अधोरेखित विरोधाभास !

कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतील या रस्त्यावरचा प्रवास कैक अडथळ्यांच्या शर्यतीने मेटाकुटीला आणतो. तर सीमेवरील आंबा घाटातून पुढे रत्नागिरी जिल्ह्यात हाय-वेचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे चकाचक रस्त्यावर विना अडथळा सुसाट धावणारी वाहने आणि चालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहाता कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्याच्या कामातील विरोधाभास नक्कीच अधोरेखित होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT