

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असलेल्या एल.सी. डिसुझा रस्त्यावर पालिकेकडून नवीन पाणी पाईपलाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खुदाईमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. धुळीच्या लोटांमुळे नागरिक, पर्यटक तसेच हॉटेल व्यावसायिक हैराण झाले आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हे काम रखडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पालिकेच्या प्रशासकीय काळात मेढा रस्त्यावरील स्वयंभू शिवलिंग मंदिरानजीक असलेल्या व्हॉल्व्हपासून सेठ गंगाधर माखरिया शाळेपर्यंत नवीन पाणी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याची व बाजूच्या गटारांची मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आली होती. मात्र, खुदाईनंतर रस्ता पूर्ववत करण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावर साचलेल्या मातीमुळे धुळीचे मोठे लोट उडत आहे. त्यामुळे श्वसनविकार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या मार्गावर अनेक हॉटेल्स असून पर्यटकांची वाहनेही येथे पार्क केली जातात. धुळीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी येणाऱ्या छोट्या विक्रेत्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी सेठ गंगाधर माखरिया शाळेनजीक पालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीचे कामही ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अपूर्ण अवस्थेत आहे. सध्या परीक्षेचा काळ सुरू असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, पालिका प्रशासन व संबंधित ठेकेदारांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.
महाबळेश्वर शहर व परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तापोळा मार्ग, बॅबिंग्टन पॉईंट परिसर, मरी पेठ, गवळी अळी, कोळी अळी, रांजणवाडी या भागांतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक व पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. धुळीच्या वाढत्या प्रमाणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
दरम्यान, एल.सी. डिसुझा मार्गावर पथदिव्यांचीही कमतरता असून रात्रीच्या वेळी हा रस्ता अंधारात जात आहे. पथदिव्यांअभावी मद्यपींचा वावर वाढला असून यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. शाळेजवळील हा रस्ता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने परिस्थिती गंभीर बनली आहे. मुख्याधिकारी योगेश पाटील व नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी या रखडलेल्या कामाची तातडीने दखल घेऊन ठेकेदाराकडून रस्ता व संरक्षक भिंतीचे काम प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.