कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी संबोधित केले. File photo
कोल्हापूर

Sharad Pawar : मला जे सोडून गेले ते पडले; शरद पवारांचा कोल्हापुरात कोणाला इशारा?

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर |Sharad Pawar : यापूर्वीही मला 54 आमदार सोडून गेले, नंतर ते निवडणुकीत पडले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फारशी चिंता करण्याची गरज नाही, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गटाचे ) सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

प्रारंभी जिल्ह्यातील इचलकरंजी, चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर व भुदरगड तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना कोणत्या मतदारसंघातून जादा मताधिक्य दिले याचा लेखजोखा मांडला. इचलकरंजी मतदारसंघात हाळवणकर व आवाडे गटातील वादाचा फायदा आपल्याला मिळू शकतो. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार एकजूट आहेत. त्यामुळे विजय निश्चित असल्याचे सांगितले.

चंदगड, आजरा, गडहिंग्लज हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या मतदारसंघातूनही आपल्या पक्षाचा विजय होणार आहे. उमेदवार कोण हे नंतर सांगा, पण हा मतदारसंघ आपल्याकडे घ्या, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेची साथ मिळत असल्याने आगामी निवडणकीत महायुतीकडून सत्ता खेचून महाविकास आघाडीला मिळणार यात शंका नाही, पण कार्यकर्त्यांनी गाफील राहता कामा नये, कष्टाची तयारी ठेवा, तुमच्या सर्वांच्या मदतीने नवीन प्रगतीचे आणि विकासाचे राज्य येईल.

या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी कोणता मतदारसंघ आपल्याकडे असावा, याबाबत मते मांडली आहेत, पण 288 पैकी आपल्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबतचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडी म्हणून लढलो. म्हणून राज्यात 31 खासदार निवडून आणता आले. सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानाला धक्का देणारे महायुतीचे सरकार आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीमध्ये सुद्धा या सरकारने भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील शिवप्रेमी जनता अस्वस्थ आहे, असेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, या मेळाव्यात काँग्रेस पक्षाचे बाजीराव खाडे यांनी राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी संतोष मेंगाणे, दिगंबर साठे, मुकुंदराव देसाई, नितीन पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, रोहित आर. आर. पाटील, रामराजे कुपेकर, नंदाताई बाभुळकर, समरजित घाटगे, राजीव आवळे, पद्मजा तिवले, अश्विनी माने तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर. के., व्ही. बी. सावध राहा

या मेळाव्यात मतदारसंघ कोणता मिळावा याबाबत कार्यकर्ते मत मांडत होते. याचवेळी पद्मजा तिवले यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ आपल्या पक्षाकडे घ्या. या मतदारसंघातून व्ही. बी. पाटील आणि आर. के. पोवार निवडणूक लढवणार नसले तरी मी रिंगणात उतरते असे सांगताच, शरद पवार यांनी आर. के. व व्ही. बी. पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकून सावध राहा, असा सल्ला देताच सभागृहात हशा पिकला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT