Chief Minister Majhi Ladaki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना  File Photo
कोल्हापूर

'लाडक्या बहिणीं'च्या यादीचे चावडीवर वाचन : जादा लाभार्थी टाळण्यासाठी खबरदारी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजनेचा प्रत्येक कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ दिला जाणार आहे. यामुळे एकाच कुटुंबातून दोनपेक्षा अधिक अर्ज मंजूर होणार नाहीत, याकरिता दाखल अर्जांनुसार गावनिहाय केलेल्या अर्जांचे चावडीवाचन केले जाणार आहे. दाखल अर्जांची छाननी कधी करायची, याबाबत अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. या योजनेसाठी स्थापन करण्यात येणार्‍या तालुकास्तरीय समित्यांच्या स्थापनेबाबतही अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. यामुळे या लाडकी बहीण योजनेसाठी सध्या केवळ अर्ज भरून घेण्याचेच काम सुरू आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेचा सुलभपणे लाभ घेता यावा, याकरिता या योजनेत सुधारणा करत काही अटी रद्द करण्यात आल्या. काही अटींत सवलत देण्यात आली. यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र जिल्ह्यात सध्या या योजनेंतर्गत केवळ अर्ज दाखल करून घेतले जात आहेत. दाखल झालेल्या अर्जांवरील पुढील कार्यवाही बंद आहे. दाखल अर्जांची छाननी आणि पात्र-अपात्रेची यादी तयार करणे आदी कामांबाबत राज्य शासनाकडून पुढील सूचना आलेल्या नाहीत. या सूचना आल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू होणार आहे.

तालुकास्तरीय समित्याही नाहीत

अर्जांची छाननी करून या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडून अंतिम केली जाणार आहे. तालुका स्तरावरही अशासकीय सदस्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. यामध्ये तहसीलदार, दोन अशासकीय सदस्यांसह 11 सदस्य राहणार आहेत. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना झाली आहे; मात्र तालुकास्तरीय समितीची स्थापना अद्याप झालेली नाही. या समितीचे नेमके कामकाज काय असणार, हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ

तालुका स्तरावरील समितीचा अध्यक्ष अशासकीय सदस्य राहणार आहे. यासह आणखी एक अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहे. तालुक्याच्या या समितीच्या अध्यक्षपदासह सदस्यपदी निवड होण्यासाठी इच्छुकांत चढाओढ सुरू झाली आहे. अनेकांनी यासाठी वरिष्ठ पातळीवरूनही फिल्डिंग लावली आहे. महायुतीत तीन घटक पक्ष असल्याने या समित्यांचे अध्यक्ष व सदस्यपदी नियुक्ती करण्यासाठी नेत्यांचीही कसोटी लागणार आहे.

एकसूत्रीपणासाठी आज आपले सरकार केंद्रचालकांचे प्रशिक्षण

या योजनेसाठी अर्ज भरण्यात तसेच यानंतर दाखल अर्जांची तपशीलवार आकडेवारी सादर करण्याचा प्रक्रियेत एकसूत्रीपणा यावा याकरिता शुक्रवारी तालुका स्तरावर आपले सरकार केंद्रचालक, महा-ई-सेवा केंद्रचालक आदींचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

लाभार्थी निश्चित करण्यावरून शहरी भागात येणार अडचणी

गावपातळीवर अंगणवाडी कर्मचार्‍यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. यामुळे प्रत्येक अंगणवाडी कर्मचार्‍याकडे त्यांनी भरलेल्या अर्जांतील व्यक्तींची माहिती आहे. त्यांचे ऑफलाईन अर्ज आहेत. तसेच केलेल्या अर्जांच्या यादीचे चावडीवाचनही होणार असल्याने एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला असेल तर समजणार आहे; मात्र शहरी भागात असे लाभार्थी निश्चित करताना अडचणी येणार आहेत.

लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तो आणखी वाढवण्यासाठी, अधिक सुलभपणे अर्ज भरण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या अर्ज दाखल करून घेतले जात आहेत. त्यांची छाननी, पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया आदीबाबत सूचना आलेल्या नाहीत.
- अमोल येडगे, जिल्हाधिकारी
SCROLL FOR NEXT