पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेला रशिया दौरा अनेकार्थांनी जगभरात चर्चेचा विषय ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन याची गळाभेट जगभरातील माध्यमांमध्ये चर्चिली गेली असली तरी, या भेटीत उभय देशांमध्ये करण्यात आलेला करार, दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करणारे ठरले. यातील महत्त्वपूर्ण करार म्हणजे 'एसयू-३० फायटर जेट'चा निर्मितीचा असून, नाशिकच्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात 'एचएएल'मध्ये या फायटर जेटची निर्मिती केली जाणार असल्याची अधिकृत माहिती मॉस्को स्थित 'स्पुत्निक इंडिया' या वृत्त एजेन्सीच्या एक्स अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
सुखोई जेट जगातील शक्तीशाली फायटर
-सुखोई जेट जगातील सर्वात शक्तीशाली फायटर जेटपैकी असून, ते एक मल्टीरोल कॉम्बॅट एयरक्राफ्ट आहे. जे जमीन आणि हवेतील युद्धासाठी वापरले जाते. हवेत कलाटण्या खाऊन शत्रुंना हुलकावणी देण्यात सुखोईची विशेष ओळख आहे.
- सुखोईमध्ये ३० एमएम फायर ग्रेनेड बसविले जाते, जे एका मिनिटात १५० राऊंड फायर करते. याव्यतिरिक्त चहुबाजुने रॉकेट्स बसविले जातात. तसेच दहा प्रकारच्या बॉम्बचा वर्षावही विमानातून करता येऊ शकतो.
- सुखोईमध्ये सुमारे ८१३० किलोचे शस्त्रास्त्रे उचलण्याची क्षमता आहे. यामध्ये ब्रम्होस मिसाइल देखील बसविता येऊ शकतो.
- या जेटमध्ये त्या-त्या देशातील भौगोलिक वातावरणानुसार बदल करता येऊ शकतो. भारतातील एचएएल कंपनीने रशियाकडून १९९७ मध्ये या जेटचा अधिकृत परवाना घेतला होता.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मॉस्को येथील भेटीदरम्यान याबाबतचा करार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या एचएएल येथे सुखोई फायटर जेटची निर्मिती केल्यानंतर ते, जगातील विविध देशांमध्ये पाठविले जाणार आहेत. सध्या नाशिकच्या एचएएलमध्ये 'मिग-२१ फायटर जेट'ची निर्मिती केली जाते. सुखोई सू-३० फायटर जेटचा वापर जगभरातील वायुसेनेमध्ये केला जातो. विशेषत: आफ्रिका, आशिया आणि लॅटीन अमेरिका या देशांमध्ये सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे सुखोईची निर्मिती भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून, भारत-रशिया बनावटीचे या फायटर जेट जगभरातील सैन्यात दिसण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या एचएएल येथे सुखोईची निर्मिती होणार असली तरी, अद्यापपर्यंत नाशिक एचएएल प्रशासनाला याबाबतची कुठलीही माहिती दिली गेली नसल्याचे जनसंपर्क अधिकारी आशिष मौर्या यांनी दिली. बंगलोर येथील काॅर्पोरेट कार्यालयातच याबाबतची माहिती मिळू शकेल असे त्यांनी स्पष्ट केले.
एचएएलमध्ये एचटीटी-४० जातीचे विशेष ट्रेनर विमाने तयार करण्याचा केंद्र शासनाने गेल्यावर्षी निर्णय घेतला होता. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी वायूदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी हे विमान फायदेशीर ठरत आहे. या प्रकल्पासाठी सहा हजार ८०० कोटी रुपयांच्या निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ६० विमानांच्या निर्मितीसाठीचा हा निधी असून, त्याकरिता तीन हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.
मिकोयान मिग-२१ हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान असून, त्याची निर्मिती नाशिकच्या एचएएलमध्ये करण्यात आली. या विमानाला 'बालालैका' या टोपणनावानेदेखील ओळखळे जाते. कारण हे विमान या नावाच्या रशियन वाद्यासारखे दिसते. मिग-२१च्या आकारामुळे त्याला पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते. जगातील सुमारे ५० देशांमध्ये आणि चार खंडात हे विमान वापरण्यात येते. मिग-२१ हे जगातले सर्वाधिक प्रमाणात निर्मिती झालेले विमान आहे. भारतात १० जून १९६६ मध्ये एचएएलमध्ये या विमानाच्या निर्मितीला सुरुवात केली गेली.