कोल्हापूर

कोल्हापूर : विशाळगडावरील वीर बाजीप्रभूंची समाधी जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

अविनाश सुतार

विशाळगड : सुभाष पाटील : तोफांची इशारत झाली. अन् घायाळ बाजीप्रभूंनी घोडखिंडीत प्राण सोडले. बांदल मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंडीची पावनखिंड झाली. विशाळगडावरील धारकऱ्यांनी बाजी व फुलाजी देशपांडे या दोघा बंधूंचे मृतदेह गडावर नेले. शिवरायांनी स्वतः पातळ दरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आजही तेथे देशपांडे बंधूंची घडीव दगडी बांधकामातील समाधी ऊन, वारा पाऊस यांचा मारा सहन करत उजाड माळरानावर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या पाच-सात वर्षांत गड- पायथा जोडणारा पूल, गडावरील पायरी रस्ता, मुंढा दरवाजा आणि आता तटबंदीची बांधणी सुरू झाली आहे. गडाच्या विकासासाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला. बुरुजाची कामे झालीत. बुरुजही ढासळला. पण ज्यांनी स्वराज्याला तारले व जे विशाळगडाच्या प्रेरणेचा स्त्रोत आहे. त्या देशपांडे बंधूंच्या समाधीकडे शासन व पुरातत्त्वची डोळे झाक झाली आहे.

समाधीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. भगवंतेश्वर ते समाधी स्थळ या दरम्यानचा फरस बंदीचा रस्ता काळाच्या ओघात गायब झाला आहे. प्लास्टिक, कोंबडीची पिसे, अस्वच्छता व दुर्गंधीने समाधीकडे जाणार्‍या वाटेची नाकेबंदी झाली आहे. गडावर येणारे बहुतेक पर्यटक गैरसोयीमुळे या समाधीकडे फिरकत नाही. समाधीच्या वाटेवरची अस्वच्छता पाहून शिवभक्त दुरूनच समाधीचे मुख दर्शन घेतो. समाधी स्थळाजवळ बारमाही पाण्याची छोटी विहीर शिवकालीन पाण्याचा स्त्रोत आहे. पण ही विहीर दगड बाटल्याने बुजलेली आहे.
बाजींच्या समाधीवर मेघडंबरी उभारून समाधी बंदिस्त बांधकामाने सुरक्षित ठेवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करत आहे. सुलभ रस्ते, पाणी सुविधा, बगीचा, वृक्षारोपण, बाजीप्रभूंच्या पराक्रमाची गाथा, कचरा कुंडी, बैठक व्यवस्था उभारून येथे सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. गडाचा शिवकालीन इतिहास चिरंतर ठेवणारे हे स्मारक होण्याची गरज आहे.

पावनखिंड ते विशाळगड ही पुढील सुमारे १२ किलोमीटरची मोहीम होत नसल्याने बाजींच्या समाधी स्थळापर्यंत शिवप्रेमींना जाता येत नाही. साहजिकच गडावरील इतिहास व बाजींच्या समाधीचे दर्शन शिवभक्तांपासून दुर्लक्षित राहते. पावनखिंडीतील बाजींच्या स्मारकापर्यंत शिवप्रेमींसह शासकीय यंत्रणाही धावते, पण गडावरील बाजींच्या समाधीकडे कोणीही फिरकताना दिसत नाही. ही खंत ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.

पुरातत्वचे अक्षम्य दुर्लक्ष

विशाळगड हा मराठ्यांच्या इतिहासातील मोजक्या किल्यांपैकी एक राजधानीचा किल्ला होता. गडावर झालेली कामे मुळातच ऐतिहासिक स्थळाला न शोभणारी आहेत. गडावर बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. या सर्व बाबींकडे पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असून देशपांडे बंधूंच्या समाधींचा जीर्णोद्धार होणे काळाची गरज आहे.

– इंद्रजीत सावंत, इतिहास संशोधक

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT