मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा
मुदाळतिट्टा-निपाणी मार्गावर वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी मुरगुडच्या स्मशान शेडजवळ आले आहे. अंदाजे फुटभर पाण्यातुन या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. पाणी वाढल्यास वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेले आठ दिवस हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. वेदगंगेच्या महापुराचे पाणी साधारणपणे सात फुटापर्यंत या ठिकाणी होते. त्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद होता. मंगळवार दिनांक 30 रोजी दिवसभर हा मार्ग वाहतुकीसाठी पाणी गेल्याने खुला झाला. आज (बुधवार) दिनांक 31 रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा या ठिकाणी एक फुटापेक्षा जास्त पाणी आले आहे.
सध्या या पाण्यातूनच वाहतूक सुरु आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे व पाटगाव धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पाणी वाढले आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावर आले. वेदगंगा नदीच्या महापुराच्या पाणी पातळीत एक फुटाची वाढ झाली. सध्या पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. मुरगूड-कापशी मार्गावरील सर पिराजी तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तिथून होणारी वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे मुरगूड- कापशी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.