कोल्हापूर

कोल्हापूर: वाकोली, निनाई परळे, कराळेवाडी, लव्हाळा रस्त्यांची चाळण

अविनाश सुतार

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुदर्शा झाली आहे. वाकोली, निनाई परळे, कराळेवाडी, लव्हाळा या रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली असून रस्त्यातून मार्ग शोधताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे घसरून अपघात होऊन अनेकजण जखमी होत आहेत. पाच किलोमीटरचा रस्ता प्रवाशांना पार करण्यासाठी तास लागत आहे. निसरड्या व खड्डेमय रस्त्यामुळे 'छे.. हो..हा रस्ता नाही, ही तर घसरगुंडी असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

वाकोली ते निनाई परळे दरम्यानचा हा रस्ता अवघा पाच किलोमीटरचा. कित्येक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, अद्याप लोकप्रतिनिधींना मुहूर्त सापडला नसल्याने नागरिक तसेच प्रवाशांची रस्त्याअभावी गैरसोय होत आहे. रस्ता धोकादायक बनल्याने येथे डांबरी रस्ता होता, की नाही हेच आता कळत नाही. रस्त्यात मोठ्या व्यासाचे पडलेले खड्डे, खड्डयांना आलेले तळ्याचे स्वरूप आणि त्यातच भर म्हणून की काय?, चिखलमय रस्ता यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यातच हा भाग म्हणजे पावसाचे माहेरघर. त्यामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. खराब रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांना या मार्गावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याचे अस्तित्वच न राहिल्याने रात्री-अपरात्री नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था पाहून सर्वपक्षीय नेत्यांनो, पदाधिकाऱ्यांनो या रस्त्याकडे पहा, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

या भागातील शालेय विद्यार्थ्यांना या तळेमय खड्डयातून तसेच चिखलमय घसरगुंडीतून परळे निनाई तसेच मलकापूर येथे कॉलेजला जाण्यासाठी ये-जा करावी लागत आहे. त्यांचे हाल होत असून शैक्षणिक नुकसानही होत आहे. तरी या रस्त्याची डागडुजी करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या मार्गावरून प्रवास म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. मी दैनंदिन या मार्गावरून प्रवास करतो. मोठे हाल होतात. एक-दोन वेळा घसरून जखमी झालो आहे.  शिवाय पर्याय नाही. दुचाकीवरून घरातील महिलांना घेऊन जाणे म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेतून ये-जा करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्ड्यांतून वाट काढताना अनेक वेळा चालकांची तसेच दुचाकीस्वारांची तारांबळ उडते. रस्त्यात खड्डयामुळे तसेच चिखल घसर गुंडीमुळे घसरून पडल्याच्या घटना अनेक घडल्या आहेत.

– संभाजी पाटील, प्रवासी

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT