Tusker Elephant Raja Attack pudhari
कोल्हापूर

Tusker Elephant Raja Attack: 'राजा' टस्कर पुन्हा आला.... नुकसान केलेल्या कारजवळ ठोकला एक तास मुक्काम, परिसरात वातावरण टाईट

Anirudha Sankpal

चंदगड : पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग जंगल क्षेत्रातून नागवे (ता. चंदगड) हद्दीत येत सतीची राई या ठिकाणी आठ दिवसापूर्वी एका कारवर हल्ला करत राजा या टस्कर हत्तीने शेजारी असणाऱ्या दोन दुचाकींचेही नुकसान केले.

यादरम्यान वन खात्याने हुसकावून लावलेल्या या टस्करने पुन्हा सोमवारी (दि. ९) रात्री आठ वाजता कारचे नुकसान केलेल्या ठिकाणी येऊन तासभर मुक्काम ठोकला. यानंतर सतीची राई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती. (Tusker Elephant Raja Attack)

सावधानता बाळगावी

त्वरित कारचे मालक विशाल सामंत यांनी चंदगड वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड व वनपाल कृष्णा डेळेकर यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने गावात वनपथक दाखल झाले.

शेतकरी व ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड व वनपाल कृष्णा डेळेकर यांनी केले आहे. खळणेकरवाडी ते सामंतवाडी यादरम्यान असलेल्या सतीची राई या ठिकाणी काही लोकांची वस्ती आहे. या ठिकाणी आठ दिवसापूर्वी हत्तीने कारची तोडफोड करत या कारचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केले होते.

परिसरात भीतीचे वातावरण

आता आठ दिवसानंतर पुन्हा त्याच ठिकाणी येऊन रात्री आठ वाजता एक तासभर मुक्काम ठोकल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. सतीची राई या ठिकाणी आठ दिवसापूर्वी स्वतः पाडलेले माडाचे झाड सोमवारी रात्री राजा टस्कर खात होता.

मागील वर्षापासून हत्तींच्या कळपावर 'राजा'चा ताबा होता. यादरम्यान 'अण्णा' टस्करला या कळपापासून बाहेर काढले होते. पंधरवड्यापूर्वी दोडामार्ग येथे 'राजा' व 'अण्णा' या दोघांमध्ये धुमश्चक्री होऊन या कळपावर 'अण्णा'ने वर्चस्व निर्माण केले आहे. या प्रकारामुळे राजा टस्कर आक्रमक झाल्याचे वनपाल कृष्णा डेळेकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT