

कोल्हापूर : नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या 126 व्या सत्राचा दीक्षान्त समारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात चंदगड (जि. कोल्हापूर) तालुक्यातील जक्कनहट्टी येथील कन्या प्रियांका शामला शांताराम पाटील यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मानाचा ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’ हा पुरस्कार पटकावला.
एका सामान्य कुटुंबामधील मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते प्रियांका पाटील यांना गौरविण्यात आले.
या पाच पुरस्कारांवर प्रियांकाची मोहोर
1. रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर (सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी) 2. बेस्ट ट्रेनी (सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी) 3. सर्वोत्कृष्ट कायदा 4. सर्वोत्कृष्ट अभ्यास 5. सर्वोत्कृष्ट कवायत (ड्रिल)
प्रबोधिनीचा दीक्षान्त सोहळा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 126 मध्ये एकूण 389 प्रशिक्षणार्थींनी (322 पुरुष आणि 67 महिला) आपले खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रबोधिनीचे सहसंचालक अरविंद साळवे यांनी सर्वांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
संघर्षातून यशाचे शिखर
प्रियांका पाटील यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आईवर आली. अशा स्थितीतही डगमगून न जाता प्रियांका यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. शालेय शिक्षणासाठी त्यांना रोज 6 किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनांचा अडसर दूर करत त्यांनी बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर पोलीस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले.