Leopard in Chandgad Forest : चंदगडच्या जंगलात बिबट्याचं दर्शन; धावत्या कारसमोर आला अन् व्हिडिओत कैद झाला

Leopard in Chandgad Forest
Published on
Updated on

चंदगड : ऐतिहासिक पारगड परिसरातील घनदाट जंगलात पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी सायंकाळी इसापूर ते चौकुळ मार्गावर एका कारचालकाला साक्षात बिबट्याचे दर्शन झाले. भररस्त्यात आलेल्या या बिबट्याला पाहून काही काळ काळजाचा ठोका चुकला, मात्र कारचालकाने प्रसंगावधान राखून या थराराचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

नेमकी घटना काय?

जेलुगडे (ता. चंदगड) येथील मूळचे रहिवासी असलेले विनायक गावडे (सध्या रा. गोवा) हे मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास आपल्या कारने इसापूर-चौकुळमार्गे गोव्याच्या दिशेने जात होते. पारगडपासून अवघ्या ४ किमी अंतरावर असलेल्या वनक्षेत्रात अचानक एक डौलदार बिबट्या रस्त्यावर आला. कार समोर येताच बिबट्याने काही काळ रस्ता अडवून धरला. विनायक गावडे यांनी तात्काळ कार थांबवून या वन्यप्राण्याला सुरक्षित अंतर राखून निहाळले आणि त्याचा व्हिडिओ बनवला. काही वेळाने हा बिबट्या शांतपणे जंगलात निघून गेला.

आरक्षित वनक्षेत्र अन् सुरक्षिततेचा प्रश्न

सदर ठिकाण हे आरक्षित वनक्षेत्र असल्याने येथे बिबट्या, गवे आणि इतर हिंस्र प्राण्यांचे दर्शन नेहमीच घडते. मात्र, भरदिवसा मुख्य रस्त्यावर बिबट्या आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये, विशेषतः दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रवाशांना सावधानतेचा इशारा

सायंकाळच्या वेळी या मार्गावरून प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे. दुचाकीस्वारांनी शक्यतो एकटे प्रवास करणे टाळावे. वन्यप्राणी दिसल्यास त्यांना साद घालणे, हॉर्न वाजवणे किंवा त्रास देणे टाळावे. रात्रीच्या वेळी या संवेदनशील क्षेत्रातून प्रवास करताना वेग मर्यादित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

विनायक गावडे यांनी टिपलेला हा बिबट्याचा व्हिडिओ सध्या चंदगड तालुक्यात आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या देखण्या वन्यप्राण्याला पाहून निसर्गप्रेमी थक्क झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news