कोल्हापूर

Kolhapur News: गतिमंद युवती अत्याचार प्रकरणाचे मलकापुरात तीव्र पडसाद; कडकडीत बंद

अविनाश सुतार

बांबवडे: पुढारी वृत्तसेवा : मलकापूर येथे झालेल्या गतिमंद युवतीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे आज (दि.१) सकाळी शहरात तीव्र पडसाद उमटले. गरीब घरातील गतिमंद युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधम आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच कोणाही विधिज्ञाने आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, अशा तीव्र भावना मलकापूर शहरवासीयांनी व्यक्त केल्या आहेत. (Kolhapur News)

पीडित २२ वर्षीय गतिमंद मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर घटनेतील संशयित आरोपीविरोधात शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रविवारी मलकापूर बंदची हाक देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सुभाष चौकात शहरातील आबालवृद्ध एकत्र जमले होते. यामध्ये महिला वर्गांची संख्या लक्षणीय होती. यावेळी महिलांचा राग अनावर झाल्यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील महिला, युवक, युवती व नागरिकांनी शहरातून निषेध फेरी काढून आरोपीच्या अटकेची मागणी केली. शहरातील दैनंदिन व्यवहार दिवसभर पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. (Kolhapur News)

अत्याचार पीडित युवती गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर पीडितेच्या आईने शाहूवाडी पोलीस ठाण्यात संशयित ५४ वर्षीय आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर शहरात उलटसुलट चर्चेमुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. सामाजिक संघटनाही शांत राहिल्याचे चित्र उभे राहिल्याचे पाहून नागरिकांमधून अतिशय संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषत: महिला व तरुणींनी अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. संशयिताला तत्काळ अटक करून आमच्यासमोर हजर करा. नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी संतप्त मागणी करीत आंदोलक महिलांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निवेदन सादर केले.

आणि महिलांना आली भोवळ 

मुळातच सदर पीडित गतिमंद युवतीवर नियतीने अशी दुर्दैवी वेळ आणल्याचे दुःख व्यक्त करणाऱ्या महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. पीडितेसह कुटुंबियांची जगण्यासाठी धडपड चाललेली असताना नराधमाच्या पाशवी अत्याचाराने अख्खे शहर हादरून गेल्याची वेदना या महिला व्यक्त करीत होत्या. आपल्याबाबतीत नेमकं काय घडलंय, याची आजही पुसटशीही कल्पना नसणाऱ्या युवतीच्या पुढ्यात संकटाचा डोंगर उभा राहिल्याचे ऐकून जमावातील काही महिलांना अक्षरशः भोवळ आली. संवेदनशील तरुणही गलबलून गेले होते. युवतींच्या अंतर्मनातील खदखद, चेहऱ्यावरचा तीव्र संताप आणि डोळ्यातून ओघळणारे अश्रू यातून घटनेचे गांभीर्य स्पष्ट होत होते.

Kolhapur News : निष्पक्ष तपास आणि कारवाईचे आश्वासन 

दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात हायगय होणार नाही. यासाठी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडे या घटनेचा तपास सोपविला आहे. निष्पक्ष तसेच आरोपीला लाभ होणार नाही, यादृष्टीने गुन्ह्याचा तपास केला जात आहे. पोलीस प्रशासनावर कसलाही दबाव नाही. घटनेचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. संशयित आरोपीला लवकरच अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी आश्वस्त करीत जमावाला शांततेचे आवाहन केले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT