किणी; पुढारी वृत्तसेवा : बेशिस्तपणे लावलेल्या कंटेनरमुळे तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात बंगळूर येथील तिघेजण जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री पुणे -बंगळूर महामार्गावर किणी गावाजवळील धोकादायक 'एस' आकाराच्या वळणावर घडला.
बंगळूर येथील त्रिलेश कुमार सी. यांनी दीड महिन्यांपूर्वी नवीन एक्सयुव्ही (क्र.केए ०२ एम एस ६६१२) गाडी घेतली होती, या गाडीतून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असताना किणी येथील महामार्गाकडेला नादुरुस्त होऊन वळणाच्या उताराला थांबलेल्या कंटेनर (क्र.एमएच ११ सिएच २७७९) ला पाठीमागून धडक दिली. ही धडक किरकोळ होती. त्या ठिकाणाहून गाडी मागे घेत असतानाच पाठीमागून तरकारी भरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक ( क्र.के ए २७ बी ४५४४) ने या एक्सयूव्हीला जोराची धडक दिली. कंटेनर आणि ट्रकच्यामध्ये या गाडीचा चक्काचूर झाला.
या धडकेने गाडीचा चालक त्रिलेश कुमार सी. (वय ४२), मागील सीटवर बसलेल्या संजना माहेश्वरी (वय २७) आणि जिथ्या त्रिलेश (वय ११ वर्षे, सर्व राहणार नॉर्थ मिनाक्षीनगर ,बसवेश्वर नगर बंगळूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालकाशेजारील सीटवर बसलेल्या आरिनी एन. ही महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर कंटेनर व ट्रक चालकानी घटनास्थळावरून धूम ठोकली आहे.
यानंतर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना ही माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. किणी येथील हॉटेल व्यावसायिक सत्यजित पाटील, अनिल खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत कार्य राबवत जखमी महिलेला रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील छ. प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी वडगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचलंत का?