जिजाऊ स्मारकाचे काम पूर्ण कधी होणार?; सहायक आयुक्तांना निवेदन | पुढारी

जिजाऊ स्मारकाचे काम पूर्ण कधी होणार?; सहायक आयुक्तांना निवेदन

बाणेर : पुढारी वृत्तसेवा: औंध परिहार चौकातील राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाचे काम रखडले असून, ते लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त यांच्याकडे केली. औंध येथील महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या परिहार चौकात अनेक वर्षांच्या मागणीनंतर राष्ट्रमाता जिजाऊंचे स्मारक उभारणे व सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून हे काम अर्धवट स्वरूपात असून, सध्या पूर्णतः बंद आहे. या चौकात वारंवार मोठ्या प्रमाणात बोर्ड बॅनर लागत असल्यामुळे या चौकाचे विद्रूपीकरण होत आहे. त्यामुळे हे रखडलेले स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून या चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत माहिती सांगताना येथील रहिवासी सचिन वाडेकर यांनी सांगितले की, चौकातील सुशोभीकरण रखडल्यामुळे स्मार्ट सिटी म्हणविणार्‍या औंधचा मुख्य चौकच भकास दिसत आहे. त्यामुळे येथील सुशोभीकरण व स्मारकाचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी सहायक आयुक्त संदीप खलाटे यांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रसंगी मनोज दळवी, अरविंद पाटील, अनिल भिसे, हरिश रुणवाल आदी उपस्थित होते. याबाबत कनिष्ठ अभियंता सुशील मोहिते यांनी सांगितले की, सध्या निधीची कमतरता जाणवत आहे. या स्मारकासाठी व सुशोभीकरणासाठी निधी मागितला आहे. कॉमन बजेटमधील निधी वापरून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

Back to top button