गेल्या पाच वर्षांमध्ये जिल्ह्यातील पाच मोठ्या ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत, तर काही ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यामुळे जिल्हा परिषदेतील गटांची संख्या कमी होणार आहे. साधारणपणे दोन गटांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम गणांच्या संख्येवरदेखील होणार आहे.
ग्रामीण भागातून कार्यकर्ते निर्माण करणारी कार्यशाळा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचेही आता बिगुल वाजले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. त्यापूर्वी निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मतदारसंघाची प्रारूप रचना करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महायुती सरकारच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपालिकेत झाले आहे. या पाच ग्रामपंचायती मोठ्या असल्यामुळे त्याचा परिणाम गटांच्या (जिल्हा परिषद मतदारसंघ) आणि गणांच्या (पंचायत समिती मतदार संघ) संख्येवर होणार आहे.
जिल्हा परिषदेचे सध्या 67 गट आहेत. पंचायत समितींच्या गणांची संख्या तालुक्यातील लोकसंख्येवर आधारित आहे. यामध्ये कमीत कमी चार गण, तर जास्ती जास्त अकरा गणांची संख्या आहे. एका गटामध्ये दोन गणांचा समावेश असतो. एक गट साधारणपणे 30 ते 35 हजार मतांचा असतो. 15 ते 16 हजार मतदारांचा एक पंचायत समितीचा गण असतो. जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ व हुपरी नगरपालिका, तर चंदगड व आजरा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आहे.
यामध्ये हातकणंगले, शिरोळ व हुपरी या मोठ्या ग्रामपंचायती होत्या. या तीन ग्रामपंचायतींमध्ये साधारणपणे 60 ते 70 हजार मतदार होते. नगरपालिकेत रुपांतर झाल्यामुळे वरील तिन्ही गावांतील मतदार जिल्हा परिषदेमधून आता वगळण्यात येतील. याशिवाय आजरा व चंदगड ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने येथील मतदानही जिल्हा परिषदेमधून वगळण्यात येणार असल्याने या दोन तालुक्यांतील काही गटांवर आणि गणांवर परिणाम होणार आहे.