कोल्हापूर

कोल्हापूर : ‘तिळगुळ घ्या.. नदी अन् पर्यावरण सांभाळा !’ महाविद्यालयीन युवतींचा पर्यावरण जागर

दिनेश चोरगे

सरूड; पुढारी वृत्तसेवा : सरुड (ता. शाहूवाडी) येथील श्रीशिव शाहू महाविद्यालयात मकर संक्रांतीच्या औचित्याने 'तिळगुळ घ्या…अन् नदी वाचवा' हा सामाजिक संदेशपर उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या हाती तिळगुळासोबत नदी संवर्धनाचे पत्रक देत जनजागृती केली. बाजारपेठ, बस थांबा, रिक्षा थांबा, प्रवासी, वाटसरू, दुकानदार विक्रेते, ग्राहक या समाज घटकांशी भेटून हस्तांदोलन करणाऱ्या महाविद्यालयीन युवती प्रत्येकाला 'तिळगूळ घ्या.. गोड बोला आणि कडवी, वारणा नद्यांचे संवर्धन करा' असा समाजभान जपणारा संदेश देत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. टी. दिंडे यांच्या संकल्पनेतून सादर उपक्रम परिसरात कुतूहलाचा विषय ठरला.

दरम्यान, उपक्रमाच्या अनुषंगाने युवतींनी सादर केलेल्या पथनाट्यातून पंचमहाभूतामधील अन्नसाखळी जतन आणि संर्वधनात प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी, अशी गरज या सादरीकरणातून मांडण्यात आली. यावेळी कडवी नदी संवर्धन समितीचे प्रमुख राजेंद्र लाड यांनी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाहूवाडीची जीवनवाहिनी असलेली कडवी नदी अमृतवाहिनी म्हणून संरक्षित करण्यासाठी तरूणाईने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. डॉ.व्ही.टी.पाटील फाऊंडेशन (कोल्हापूर) च्या सहयोगातून नदी काठ संवर्धित करण्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी डॉ.प्रकाश वाघमारे, प्रा. प्रकाश नाईक, डॉ.रघुनाथ मुंडळे, प्रा. के.एन.पाटील उपस्थित होते. प्रबोधन पथकात सानिका पोवार, राजश्री पाटील, जानवी पाटील, प्राची घोलप, प्रतीक्षा माळी, काजल तळप, सायली पाटील, तेजस्विनी नाडगोंडे या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. प्रा. दादासाहेब श्रीराम, डॉ. नवनाथ गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

   हेही वाचा :

SCROLL FOR NEXT