विशाळगड : गजापुरातील मुसलमानवाडीला विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनात ४१ कुटुंबाच्या घरांची, वाहनांची तोडफोड, अन्नधान्य, कपड्यांची नासाडी करण्यात आली. धो-धो पाऊस, आंदोलकर्त्यांचा अचानक हल्लामुळे कुटुंबातील लोकांना जंगल-झाडाझुडुपांचा आधार घ्यावा लागला. रेश्मा प्रभुलकर यांचे घर जाळण्यात आलं. रेश्मा आणि त्यांची सासू कपडे, बांगड्या अशा वस्तूंचं दुकान चालवायच्या. हल्ला झाला तेव्हा दोघीही मुलांसोबत घरातच होत्या. हल्लेखोर इतके आक्रमक होते की, त्यांना घाबरून त्या मुलांसोबत जंगलात पळून गेल्या. या घटनेला आज आठवडा होत आहे.
आजही ही कुटुंबे पूर्वपदावर आलेली नाहीत. आजही वाडीत भीती, डोळ्यात अश्रूंच्या धारा, आक्रोश थांबलेला नाही. भेटणाऱ्या प्रत्येकालाच ‘ते आम्ही काय केलंय ज्यामुळे आमच्या वाटेला ही परिस्थिती आली’ हा प्रश्न विचारतात.
विशाळगड अतिक्रमणमुक्त करून त्याचे ऐतिहासिक सौंदर्य व महत्त्व अबाधित राहावे आणि त्याचे जतन-संवर्धन-संरक्षण राष्ट्रीय संपत्ती म्हणून व्हावी, या उद्देशाने विशाळगड मुक्ती आंदोलन छत्रपती संभाजीराजे तसेच विविध संघटनेच्या वतीने रविवार (दि १४) रोजी पुकारले होते. शिवभक्त कसल्याही परिस्थितीत विशाळगडावर रविवारी धडकणारच असा इशारा संभाजीराजे यांनी प्रसिद्धी पत्रकासह सोशल मीडियावर दिला होता..
मात्र, दीड वर्षे होऊनही अतिक्रमणे हटविली गेली नसल्याने रविवारी (दि १४) रोजी छत्रपती संभाजीराजे व विविध संघटना गडाच्या पायथ्याशी एकत्रित झाल्या.या आंदोलनात हजारो शिवभक्त सहभागी झाले. गडावर जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने शिवभक्तांत चीड निर्माण होऊन आंदोलनाने हिंसक वळण घेतले.
गड पायथा तसेच गजापुरातील मुसलमानवाडीला आंदोलकर्त्यांनी लक्ष करत घरांचे, गाड्यांचे, मशिदीचे, प्रापंचिक साहित्यांचे नुकसान केले. ऐन पावसात हा हल्ला झाल्याने जीवांच्या आकांताने वाट दिसेल तिकडे रहिवासी पळून जीव वाचवला. संध्याकाळी वस्तीत येतात तर घरात प्रापंचिक साहित्यांचे, वाहनांची तोडफोड, घरांवर दगड फेक, घराला गळती, फुटलेली कौले, पत्रे, गॅस टाक्या, पाण्याच्या बॉटल आणि निवासाची गैरसोय पाहून अक्षरशः नुकसानग्रस्त गळून पडलेत. आता संसार सावरायचा कसा, या विचाराने त्यांच्या डोळ्यांचे अश्रू काही कमी होईनात, भीती, आर्थिक नुकसान, घरांच्या उभारणीसाठी लागणारा पैसा कोठून आणायचा या विवंचनेत येथील नुकसानग्रस्त आहेत.