वाडा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कळमोडी धरणात जून महिना उलटूनही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. जुलै महिना सुरू होऊनदेखील धरणक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने धरणाचा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसह आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठार भागास नंदनवन करणार्या कळमोडी प्रकल्पाची साठवण क्षमता 1. 97 टीएमसी आहे.
सध्या कळमोडी धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील कळमोडी, चिखलगाव, देवोशी, येणवे, साकुर्डी या गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
एक जूनपासून धरण परिसरात 266 मि.मी. पावसाची नोंद झाली. मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी धरणात तब्बल 41 टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी 10 जुलै रोजी धरणात 76 टक्के पाणीसाठा होता. सध्या 39 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी धरण 17 जुलैला ओव्हरफ्लो होऊन सांडव्यावरून पाणी वाहत होते.