Black Magic Kolhapur  
कोल्हापूर

Black Magic Kolhapur | बाटलीत आत्मा बंद करून पसार झालेला मांत्रिक अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

Black Magic Kolhapur | पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अघोरी पूजेच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पुढारी वृत्तसेवा

शिरोली (एमआयडीसी) : पुढारी वृत्तसेवा
पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अघोरी पूजेच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या विचित्र पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर फरार असलेला मांत्रिक किशोर लोहार यास शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासोबत व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या अभिजीत उर्फ मोसम यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, पुलाची शिरोली गावातील स्मशानभूमीत अघोरी पूजा करून “बाटलीत आत्मा बंद केला असून दोन दिवसांत रिझल्ट मिळेल” असे किशोर लोहार व्हिडिओत बोलताना दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. गावात या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी प्रशासनाकडे लोहारविरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी केली होती. यावर शिरोली पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला होता, मात्र त्यानंतर तो फरार झाला होता.

शिरोली पोलिसांनी पथक तयार करून शोध मोहीम हाती घेतली. बुधवारी अखेर किशोर लोहार शिरोली येथील आपल्या घरी लपलेला असताना सापडला आणि त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत व्हिडिओ चित्रीकरण करणारा मोसम (अभिजीत) यालाही ताब्यात घेण्यात आले. मात्र, ज्या व्यक्तीसाठी ही अघोरी पूजा करण्यात आली तो रमेश गावकर याच्यावर सध्या कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, कारण तो आजाराने त्रस्त असून त्याने कोणतीही फसवणूक केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

तपासात उघड झाले आहे की, गावकर हे गेली सहा वर्षे पायाच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. अनेक डॉक्टरांकडे उपचार करूनही बरे न झाल्याने तो मानसिकदृष्ट्या खचला होता. प्रवासादरम्यान त्याची ओळख मांत्रिक किशोर लोहारशी झाली. लोहारने त्याला सांगितले की, “मी अशा प्रकारची पूजा करतो, सोशल मीडियावरही मी याचे व्हिडिओ पाहिले आहेत, त्याने आजार बरे होतात.” या सांगण्यावर विश्वास ठेवून गावकरने त्याच्याकडे पूजा करून घेण्याचे मान्य केले.

27 ऑक्टोबर रोजी शिरोली स्मशानभूमीत ही अघोरी पूजा करण्यात आली. त्या वेळी लोहारने अभिजीत याला या विधीचे चित्रीकरण करण्यास सांगितले. चित्रीकरण झाल्यानंतर हा व्हिडिओ स्थानिकांना पाठवण्यात आला आणि पाहता पाहता तो सोशल मीडियावर पसरला. नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.

सध्या शिरोली पोलिस दोघांकडे कसून चौकशी करत असून या चौकशीत इतरही अशा प्रकारच्या अघोरी पूजांचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT