

कोल्हापूर : शहरातील गजबजलेल्या नागाळा पार्क परिसरात बिबट्या शिरल्याने मंगळवारी एकच खळबळ उडाली होती. वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आले. बुधवारी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मात्र, या थरारक घटनेची आठवण काढली, तरी नागरिकांच्या काळजात धस्स होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी मॉर्निंग वॉकला सुट्टी घेतली आहे.
बिबट्यामुळे नागाळा पार्क परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे. रात्री कशाचाही आवाज आला की, लोक दचकून जागे होतात. काही रहिवाशांनी तर रात्री बाहेर पडणेही बंद केले आहे. मंगळवारी सकाळी बिबट्या नागाळा पार्क परिसरातील भरवस्तीत घुसला. अनेकांनी त्याची डौलदार चाल, गुरगुरनं आणि रुद्रावतार गॅलरी, खिडक्यांधून पाहिला. वन विभागाने या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडले. तरीही हा बिबट्या पुन्हा परत येईल की काय, याची धास्ती लागून आहे. परिसरातील नागरिक अजूनही सतर्क आहेत. रात्री घराबाहेर पडतानादेखील नागरिकांना डोळ्यासमोर बिबट्या दिसतो. रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज जरी आला, तरी दचकून जाग येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.