ऊसदरासाठी किणी टोलनाक्यावर शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन File Photo
कोल्हापूर

Kolhapur Shetkari Sanghatana Protest: पुणे-बंगळूर महामार्गावर शेतकऱ्यांचा चक्काजाम; कोल्हापूरहून पुण्याला जाणारी वाहतूक वळवली

Swabhimani Shetkari Sanghatana Protest: चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू आहे.

मोहन कारंडे

Swabhimani Shetkari Sanghatana Protest

कोल्हापूर: चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह बेळगाव सीमाभागातील हजारो शेतकरी आजही महामार्गावर उतरले आहेत. या आंदोलनाचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

चक्काजाममुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे. कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक सांगली फाटा येथून हातकणंगले मार्गे, तसेच शिये फाटा येथून वारणा-कोडोली मार्गे वळविण्यात आली. त्यामुळे सांगली फाटा या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. परिणामी पोलीस यंत्रणेवरती वाहतूक कोंडीमुळे ताण वाढला आहे.

यंदाच्या गळीत हंगामासाठी तुटणाऱ्या उसाला विनाकपात ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे छावणी आंदोलन सुरू आहे. यादरम्यान, प्रशासन आणि साखर कारखानदारांबरोबर चर्चेच्या दोन फेऱ्या होऊनही तोडगा न निघाल्याने संघटनेने महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टोलनाक्यावरील बूथवरच ठिय्या मांडत मागणी मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली होती.

मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला रोखणार

शासनाने कोणताही प्रयत्न न केल्याने पुढचे पाऊल म्हणून मुंबईकडे जाणारे दूध व भाजीपाला रोखण्याचा इशारा देण्यात आला. ऊसदराच्या मागणीसाठी किणी टोलनाक्यावर सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनाला रात्रीही शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो शेतकऱ्यांनी रात्री आंदोलनस्थळीच मुक्काम ठोकला. रात्री झालेल्या सभेत शेतकरी अठरा अठरा महिने कष्ट करून ऊस पिकवतो. महागडी खते, औषधे आणि पाणी यासाठी मोठा खर्च करतो. मात्र, आपल्या उसाला किती दर मिळणार, हे विचारण्याचाही अधिकार त्याला मिळत नाही. उसापासून तयार होणाऱ्या साखर, इथेनॉल, मळी आणि अन्य उपपदार्थांना बाजारभाव मिळतो; मग ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या उसाला योग्य दर देण्यास कारखानदारांची टाळाटाळ का असा सवाल विविध वक्त्यांनी यावेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT