FDA Pudhari
कोल्हापूर

Kolhapur FDA raids : शिरोळ तालुक्यात पाणी शुद्धीकरण प्रकल्प FDAच्या रडारवर

धडक तपासणीची शक्यता; अनेकांचे धाबे दणाणले...

पुढारी वृत्तसेवा

बिरू व्हसपटे

शिरढोण : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विनापरवाना व नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या पॅकेज्ड पिण्याच्या पाणी प्रकल्पांवर धडक कारवाई सुरू केल्यानंतर शिरोळ तालुक्यातील अनेक लहान मोठे पाणी शुद्धीकरण प्रकल्पही एफडीएच्या रडारवर आले आहेत. व्यवसायाबाबत पाणी तपासणी अहवाल आणि कडक निर्बंधामुळे तालुक्यातील अनेक प्रकल्प चालकांचे धाबे दणाणले असून, लवकरच तपासणी मोहीम राबविली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यातील विविध ठिकाणी एफडीएने आवश्यक परवाने नसणे, अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया, निकृष्ट दर्जाचे पाणी, प्रयोगशाळेच्या चाचण्यांतील त्रुटी आणि एफएसएसएआयच्या नियमांचे उल्लंघन आढळून आलेल्या प्रकल्पांवर कारवाई केली आहे. लाखो रुपयांचा पॅकेज्ड पाण्याचा साठा जप्त करण्यात आला असून, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्या प्रकल्पांना 'स्टॉप बिझनेस' नोटिसा बजावून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शिरोळ तालुक्यातही पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे अनेक प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांकडे आवश्यक परवाने, एफएसएसएआय नोंदणी, स्वच्छता, पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी आणि उत्पादन प्रक्रियेचे निकष पाळले जात आहेत का, याची तपासणी होण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

...कारवाईची ही आहे प्रक्रिया

एफडीएच्या तपासणीदरम्यान पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे परवाने, एफएसएसएआय नोंदणी, उत्पादन प्रक्रियेतील स्वच्छता, पाण्याच्या गुणवत्तेच्या तपासणीचे अहवाल आणि प्रयोगशाळेची नोंदवही तपासली जाते. संशयास्पद पाण्याचे नमुने तपासणीसाठी जप्त केले जातात. नियमांचे उल्लंघन आढळल्यास 'स्टॉप बिझनेस' नोटीस बजावून साठा जप्त करण्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT