Raigad contaminated water : पुरानंतर रायगडवासियांसमोर दूषित पाण्याचे संकट

सांडपाणी, गाळ, चिखल, कचरा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये; जिल्ह्यात जलजन्य आजारांचा धोका वाढला
Raigad contaminated water
Raigad contaminated waterpudhari photo
Published on
Updated on

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

रायगड जिल्ह्यात सलग सहा दिवस कोसळल्‍यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असली, तरी अतिवृष्टीचे परिणाम अद्याप कायम आहेत. रोहा, नागोठणे, माणगाव, महाड, पेण, आदी भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहिल्याने घरे, बाजारपेठा आणि पाणीपुरवठ्याचे स्रोत पुराच्या पाण्याखाली गेले. पावसामुळे पाणीचिंता दूर झाली असली, तरी आता दूषित पाण्यामुळे जलजन्य साथीच्या आजारांचे नवे संकट निर्माण झाले आहे.

पूराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ, चिखल, कचरा, सांडपाणी आणि इतर घाण पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळली आहे. अनेक ठिकाणी विहिरी, बोअरवेल, तलाव आणि लहान पाणीपुरवठा योजना पुराच्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे या स्रोतांमधील पाणी गढूळ आणि अशुद्ध झाले आहे.

Raigad contaminated water
Water conservation: गावा-गावातील पाण्याची नासाडी परवडणार नाही

जिल्ह्यातील प्रादेशिक नळपाणी योजना, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजना तसेच ग्रामपंचायतींच्या स्थानिक पाणीपुरवठा व्यवस्थांवरही याचा परिणाम झाला आहे. काही गावांमध्ये नळातून चिखलयुक्त व गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. पाणी शुद्धीकरण केंद्रांवरही अतिरिक्त ताण निर्माण झाला असून, गढूळ पाण्यामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक कठीण झाली आहे.

आरोग्य विभागाच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील मानली जाते. अशुद्ध पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉईड, कॉलरा यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढतो. पूर ओसरल्यानंतर साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असल्याने प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.

यंदाच्या मुसळधार पावसाने रायगडची पाण्याची चिंता दूर केली असली, तरी पूरानंतर निर्माण झालेले दूषित पाण्याचे संकट अधिक गंभीर ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने युद्धपातळीवर पाणी शुद्धीकरण, निर्जंतुकीकरण आणि आरोग्यविषयक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक खबरदारी घेतल्यास संभाव्य साथीच्या आजारांना आळा घालणे शक्य होणार आहे.

स्वच्छ पाणी मिळणार?

पुरामुळे जलस्त्रोत हे दूषित झाले आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तातडीने जल शुद्धीकरण करावे जेणेकरून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल असा सूचना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले

Raigad contaminated water
Jayakwadi Dam Water Level : जायकवाडी धरणाची पाणीपातळी घसरली

तातडीने करण्याच्या उपाययोजना

सर्व पाणीपुरवठा योजनांमध्ये प्रभावी क्लोरीनेशन करावे विहिरी, बोअरवेल, तलाव व सार्वजनिक पाण्याचे स्रोत निर्जंतुक करावेत दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या भागात सुरक्षित पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी आरोग्य विभागाने गावागावांत पाण्याचे नमुने तपासून आवश्यक सूचना जारी कराव्यात संयुक्त जनजागृती मोहीम राबवावी साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

पिण्याचे पाणी किमान १५ ते २० मिनिटे उकळूनच वापरावे. क्लोरीन गोळ्यांचा किंवा अधिकृत निर्जंतुकीकरण पद्धतीचा वापर करावा. गढूळ किंवा रंग बदललेले पाणी पिणे टाळावे. हातांची स्वच्छता आणि अन्नाची स्वच्छता राखावी. उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. विहीर किंवा पाण्याचा स्रोत दूषित झाल्याचे आढळल्यास ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाला त्वरित कळवावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news