शिरढोण (ता. शिरोळ) येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत वादावादी आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | शिरढोण ग्रामसभेत राडा : अंगावर धावून जाण्याचा प्रकार; भ्रष्टाचार, मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Shirdhon Gramsabha Protest | शिरढोण (ता. शिरोळ) येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत खर्चांच्या बिलांवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला

पुढारी वृत्तसेवा

Shirole Shirdhon Gramsabha protest

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत घरपट्टी, दिवाबत्ती, पाणीपट्टी यांसारख्या निवासी कराच्या थकीत रकमेस ५० टक्के सवलत देण्याचा ठराव सरपंच सागर भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला. यावेळी बोगस बिले, भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार झाला असल्याच्या रागातून ग्रामस्थ आक्रमक झाले. प्रचंड वादावादी आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने ही विशेष ग्रामसभा बोलावली होती. थकीत मालमत्ताधारकांना दिलासा देतानाच सभेत गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायतीने केलेल्या २ कोटी ७२ लाखांच्या कामांत बोगस बिलांचा संशय व्यक्त करत ग्रा.पं. कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

ग्रामस्थांनी आरोप केला की ग्रामपंचायतीची कामे सदस्य आणि निश्चित ठेकेदारांमार्फतच केली जातात. टेंडर नोटीसही बंद पडलेल्या दैनिकांत देत असल्याने पारदर्शकतेचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर विकासकामांचे डिजिटल बोर्ड लावणे, सदस्यांकडून कामे बंद करणे आणि बोगस काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागण्या सभेत करण्यात आल्या. आरओ फिल्टर, डस्टबिन, संगणक दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरा, समाजमंदिर दुरुस्ती यासारख्या अनेक खर्चांच्या बिलांवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला.

सभेत दोषींवर खातेनिहाय चौकशी करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर झाला. चर्चेत सुरेश सासणे, माजी उपसरपंच पोपट पुजारी, अविनाश पाटील, विजय सूर्यवंशी, शाहीर बानदार, मनोज गुरुवाण आदींनी सहभाग घेतला. सदस्य भास्कर कुंभार, रवी कांबळे, शक्ती पाटील, आरिफ मुजावर, बाबासो हेरवाडे, तेजस्विनी पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षांतील सर्व कामांचे लेखापरीक्षण करून खातेनिहाय चौकशी करावी, “अलीबाबा चाळीस चोरांची टोळी ग्रामपंचायतीवर दरोडा घालत आहे” असा आरोप करत ही मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे सुरेश सासणे, माजी उपसरपंच अविनाश पाटील, पोपट पुजारी, प्रा. चंद्रकांत मोरे, विश्वास बालीघाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT