

Shirol Shirdhon Gram Panchayat scam
शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीतील सरपंच सागर भंडारे यांचा राजीनामा प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायप्रविष्ट असताना ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांनी काढलेल्या निवेदनामागे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार झाकण्याचा डाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भातील निवेदन ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिले असून त्यात सदस्यांच्या भूमिकेवर तीव्र टीका करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी म्हटले आहे की ग्रामपंचायतीच्या कारभारात झालेले कथित भ्रष्टाचार प्रकरण झाकण्यासाठीच सरपंच राजीनामा मुद्दा पुढे केला जात आहे. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या न्यायनिकाली प्रलंबित असलेल्या प्रकरणावर सदस्यांनी वक्तव्ये करणे तसेच निवेदने देणे अयोग्य असून न्यायप्रक्रियेला प्रभावीत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीतील गैरकारभारापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सरपंच सागर भंडारे यांना नाहक लक्ष्य केले जात असल्याचेही ग्रामस्थांनी म्हटले आहे. आगामी १२ डिसेंबरला होणाऱ्या ग्रामसभेत जनतेकडून या सर्व बाबींचा जाब विचारला जाईल. गावकरी सुज्ञ असून हे संपूर्ण षड्यंत्र ओळखू शकत नाहीत असे काही नाही, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर माजी उपसरपंच अविनाश पाटील, माजी उपसरपंच विजय सूर्यवंशी, प्रवीण दानोळे, अरुण ऐनापुरे, नागेश कोळी यांच्या सह्या आहेत.