Kolhapur News | शिरढोण ग्रामपंचायतीत सहीच्या मुद्द्यावर गोंधळ; करसवलत, गावसभा नोटीसवरून वादावादी
Shirol Shirdhon Grampanchayat notice dispute
शिरढोण: शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत सहीच्या अधिकारावरून तसेच ५० टक्के करसवलतीच्या योजनेवरून ग्रामस्थ व सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. ग्रामसभेची नोटीस उशिरा का काढली? करसवलतीला का विरोध केला, गावसभा का घेतली जात नाही, यासह अनेक गंभीर प्रश्नांवर ग्रामस्थांनी ग्रामसेवक व सदस्यांना धारेवर धरले. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
सन २०२२ पासून आजअखेर झालेल्या कारभाराचे शासकीय लेखापरीक्षण तातडीने करण्यात यावे आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. सरपंच निवड प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने सध्या सहीचा अधिकार कोणाकडे असावा, यावरून गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतीत वाद सुरू आहे.
गावसभेची नोटीस सरपंच सागर भंडारे यांच्या सहीने का काढण्यात आली, यावर काही सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. उपसरपंच शिवानंद कोरबू यांच्या सहीनेच कारभार चालवावा, अशी मागणी केल्याने वादाला अधिकच उधाण आले. ५० टक्के करसवलत योजनेची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले.यावेळी भाजप नेते सातगोंडा पुजारी,सुरेश सासणे,अविनाश पाटील,विश्वास बालीघाटे आदी प्रमुखासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..मिटिंग नोटीस वहीत खाडाखोड
मिटिंग नोटीस वहीमध्ये काही सदस्यांनी जाणीवपूर्वक आपल्या नावासमोर खाडाखोड केल्याचा आरोप होत असून याची तक्रार गटविकास अधिकारी घोलप यांच्याकडे केल्याचे ग्रामसेवक जथ्थे यांनी सांगितले. दरम्यान अखेर १२ डिसेंबर रोजी विशेष गावसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तात्पुरता वाद शमला असला, तरी होणारी गावसभा वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

