Kolhapur Shirol Housing Subsidy Delay
शिरढोण/बिरू व्हसपटे : शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथे शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे अनुदान वेळेत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा सुरू असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
स्वतःचे घर उभारण्याच्या उद्देशाने अनेकांनी बँकांकडून कर्ज घेतले, तर काहींनी नातेवाईकांकडून उसनवारी करून घरकुल बांधकामाला सुरुवात केली. प्रारंभीचा हप्ता मिळाल्यानंतर कामाला गती मिळाली; मात्र पुढील हप्ते न मिळाल्याने अनेकांची बांधकामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे.
शिरढोणमध्ये एकूण ३६५ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून त्यापैकी १०२ जणांनी प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले आहे. मात्र जिओ-टॅगिंग प्रक्रिया, तांत्रिक अडचणी तसेच ऑनलाइन प्रणालीतील त्रुटींमुळे पुढील हप्त्यांचे वितरण रखडल्याचे समोर आले आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेकांच्या खात्यावर निधी जमा झालेला नसल्याची तक्रार आहे.
दरम्यान, बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरांमुळे खर्चात मोठी वाढ झाली असून अनुदानातील विलंबामुळे लाभार्थ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शासनाने तातडीने तांत्रिक अडथळे दूर करून प्रलंबित हप्ते वितरित करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. अन्यथा अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिरढोण येथे ३६५ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून १०२ जणांनी बांधकामास सुरुवात केली आहे. मात्र दुसरा आणि तिसरा हप्ता गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असल्याने अनेक घरे अर्धवट अवस्थेत आहेत. जिओ-टॅगिंग आणि तांत्रिक त्रुटींमुळे निधी वितरणात विलंब होत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.
घरकुल लाभार्थ्यांनी तात्काळ जिओ ट्रॅकिंग तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे अनुदान थकले आहे. त्यांचे अनुदान लवकरच जमा होईल.- विराज जथ्थे, ग्रामसेवक, शिरढोण