

कोल्हापूर : कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना खासदार शाहू महाराज यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आत्मचरित्र ‘सिंहायन’ भेट दिले. मराठा आरक्षण चळवळीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जडणघडणीचे भागीदार आणि साक्षीदार असलेल्या डॉ. जाधव यांचे ‘सिंहायन’ हे चालता-बोलता इतिहासच असून ते सामाजिक लढ्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
कोल्हापूर गॅझेटियर लागू करावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाज प्रयत्नशील आहे. यापार्श्वभूमीवर जरांगे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी खा. शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यू पॅलेस येथे झालेल्या बैठकीत कोल्हापूर गॅझेटियरमधील मराठा-कुणबी नोंदी, मराठा आणि कुणबी एकच असल्याबाबतचे विविध पुरावे आदींबाबत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत खा. शाहू महाराज यांनी जरांगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जरांगे यांनीही शाहू महाराज यांचा सत्कार केला. यावेळी खा. शाहू महाराज यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आत्मचरित्र ‘सिंहायन’ जरांगे यांना भेट दिले. जरांगे यांनी ही भेट जपून घरी घेऊन जाऊ असे सांगत, तशी सूचना सोबत असलेल्या सहकाऱ्याला दिली.