कोल्हापूर

Kolhapur news | शिरढोण-टाकवडेतील शेतकऱ्यांचा महावितरणला घेराव

...आठ तासांत अनेकवेळा ट्रिपिंग; ‘वरील आदेश’ सांगणाऱ्या यंत्रणेमुळे शेतकरी संतप्त

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : पंचगंगा नदीकाठावरील शिरढोण व टाकवडे परिसरातील शेतकरी सध्या पावसाअभावी आणि महावितरणच्या विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने पिकांना जीवदान मिळावे म्हणून तीन दिवसांची उपसा बंदी शिथिल केली असली तरी प्रत्यक्षात वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

उपसा बंदी उठविल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी अवघ्या आठ तासांच्या कालावधीत अनेकवेळा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नदीतून पाणी उपसा करून पिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ठप्प झाले. वारंवार वीज खंडित होत असल्याने मोटारी, स्टार्टर व इतर विद्युत उपकरणांच्या बिघाडाचे प्रमाणही वाढले आहे. पिके वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याबाबत विचारणा केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी ‘वरील आदेशानुसार वीजपुरवठा बंद केला जात आहे’ असे सांगत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे नेमका निर्णय कोणाचा आणि जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांची अवस्था सध्या ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली असून ना पाणी मिळत आहे ना समाधानकारक उत्तर.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री सुमारे अकरा वाजता शिरढोण व टाकवडे येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत संताप व्यक्त केला. वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, ट्रिपिंग थांबवावे आणि नादुरुस्त यंत्रणेची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे, मनोजकुमार चौगुले, बाबासो हेरवाडे, सुशांत चौगुले, बाळासो कोळी, जग्गू बिरोजे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

शेतकऱ्यांची व्यथा

उपसा बंदी शिथिल झाल्यानंतरही अखंडित वीज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आठ तासांत अनेकवेळा ट्रिपिंग होत असताना कर्मचारी ‘वरील आदेश’ असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT