सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर शरद पवारांची आजही करडी नजर आहे.  file photo
कोल्हापूर

संख्याबळावरच ठरणार राज्याचा मुख्यमंत्री : पवार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जनतेचा प्रतिसाद पाहता राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर परिवर्तन होणार, हे अटळ आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्‍याबाबत आताच आग्रह धरण्यात अर्थ नाही. निकालानंतर मुख्यमंत्री कुणाचा ते संख्याबळावर ठरविता येईल, अशी स्पष्ट भूमिकाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट करण्याचा आग्रह धरला जात असताना पवार यांनी केलेल्या विधानाला राजकीय वर्तुळात महत्त्व दिले जात आहे. जनतेच्या पाठिंब्यानंतर राज्यात स्थिर सरकार देणे हे आमचे उद्दिष्ट राहील, असे सांगून पवार म्हणाले, शनिवारपासून महाआघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू होईल. निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, उमेदवार ठरले नाहीत, अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्‍याबाबत चर्चा करण्यात अर्थ नाही. आणीबाणीच्या काळात निवडणूक लढविली तेव्हा कोणताही चेहरा नव्हता. निवडणूक झाल्यानंतर मोरारजी देसाई यांचे नाव पुढे आले. त्यामुळे निवडणुकीनंतर मिळणार्‍या संख्याबळावर मुख्यमंत्रिपदासाठी नाव ठरविता येईल, असे पवार म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. 7 ते 9 सप्टेंबर या कालावधीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होईल, असे पवार यांनी सांगितले. लोकसभेला ‘मविआ’ला पाठिंबा देणार्‍या शेकाप, भाकप, माकप या घटकपक्षांची मते जाणून घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

खोटा इतिहास मांडण्याचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न

छत्रपती शिवरायांचा चुकीचा, खोटा इतिहास सत्ताधार्‍यांकडून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा खोटा इतिहास नव्या पिढीसमोर मांडू नये. त्यामुळे समाजात गैरसमज, तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम मर्यादित अनुभव असणार्‍या व्यक्तीला देणेच योग्य नव्हते. त्यामुळेच ही घटना घडली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेने सर्वजण अस्वस्थ आणि दु:खी आहेत, असे ते म्हणाले.

महिलांवरील अत्याचार, विनयभंगाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्याच्या गृह खात्याने कठोर पावले उचलत संबंधितांवर कारवाई करून लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज होती. त्यामध्ये गृह खात्याला यश आले नाही. आरोपींना अद्याप अटक नाही. महाराष्ट्रात असे प्रथमच घडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

बदलापूर येथील घटना संतापजनक आणि घृणास्पद आहे. याविरोधात सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले; परंतु बाहेरून माणसे आणल्याचा प्रचार काही मंडळी करू लागली. संताप व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्यांवर सरकारने खटले दाखल केले. हे निंदनीय आहे. यावर प्रतिक्रिया उमटणारच होती. यामध्ये राजकारण आणले जात असल्याचा आरोप चुकीचा आहे, असे पवार म्हणाले.

सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार

सत्तेचा गैरवापर आणि भ—ष्टाचाराचा पुरस्कार हेच सरकारचे सूत्र झाले आसून, ते चिंताजनक आहे. विधानसभा निवडणुकीत आमचा हा प्रचारात मुद्दा असेल, असे त्यांनी सांगितले. जातनिहाय जनगणनेची आम्ही सतत मागणी करत आहोत. यामुळे समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय देता येणे शक्य होईल. लोकांच्या भावनेला हात घालून मूलभूत प्रश्नांपासून बाजूला नेण्याची भाजपची खासियत आहे. त्यामुळे श्रीराम मंदिरावरून त्यांना लोकसभेला यश मिळेल, असे वाटत होते. परंतु, अयोध्येतच त्यांचा उमेदवार पराभूत झाला. यावरून राजकारण्यांपेक्षा सामान्य माणूस शहाणा असतो, हे दिसून आले आहे.

पक्षामध्ये प्रवेश देताना असलेल्या स्थानिक नेतृत्वाला डावलून कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. भागात त्यांचे काम, त्यांची उपयुक्तता आणि चारित्र्य पाहूनच निर्णय घेतले जातील, असे सांगत पवार म्हणाले, सत्ताधार्‍यांना लोकांचा प्रचंड विरोध आहे. मोदींशिवाय पर्याय नाही, असे नसलेले चित्र उभे केले होते. ते आता दिसत नाही. शेतकरीविरोधी सरकारचे धोरण असल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे.

पवार काय म्हणाले

  • एस.टी.चा संप लवकर मिटवावा

  • महापुरुषांचा अनादर करणार्‍यांना परिणाम भोगावे लागतील

  • पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रात महिला संरक्षणविषयक कायद्यासाठी प्रयत्न

  • देशातील रस्ते सुधारण्यात नितीन गडकरींचे योगदान

  • सत्ताधार्‍यांकडून खोटा इतिहास मांडण्याचा प्रयत्न

  • वाढते गुन्हे पाहता, राज्याचे गृह खाते अपयशी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT