इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने येथे काळ्या फिती लावून मुक आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. सकाळी १० वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते. आ. जयंत पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थीनींनी या आंदोलनात भाग घेतला. महिलांची संख्या मोठी होती. विविध संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलकांच्या हातात सरकारच्या निषेधाचे फलक होते.
यावेळी बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, वारंवार घडणाऱ्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे महिला विद्यार्थीनी भयभीत आहेत. सरकार अशा घटना रोखण्यात अपयशी ठरत आहे. बदलापूर येथील घटनाही दडपण्याचा सरकारचा प्रयत्न होता. परंतू जागरुक पालकांनी तो डाव हाणून पाडला आहे. अत्याचाराचे गुन्हे चौपट वाढले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे.
तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव, ॲड. धर्यशील पाटील, खंडेराव जाधव, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुभाष सुर्यवंशी, भगवान पाटील, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.