मालवण येथील श्री शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून राजकारण करणार्या आणि ‘जोडे मारो’ आंदोलन करणार्या विरोधकांत हिंमत असेल तर समोरासमोर या, बघतो, या भाषेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खा. सुनील तटकरे, खा. सुनेत्रा पवार, रूपाली चाकणकर, रूपाली ठोंबरे, सूरज चव्हाण, पार्थ पवार, प्रदीप गारटकर, किरण गुजर, सचिन सातव, वैशाली नागवडे, दिगंबर दुर्गाडे, केशवराव जगताप, प्रशांत काटे, पुरुषोत्तम जगताप, सुनील पवार, विक्रम भोसले, पोपटराव गावडे, विश्वास देवकाते, संभाजी होळकर, अनिता गायकवाड, ज्योती लडकत आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. कोणाचेही सरकार असले तरी महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्रीशिवरायांचा पुतळा कोसळावा असे कोणाला वाटेल? असा सवाल करून ते म्हणाले, या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादीने मूक आंदोलन करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. मी राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागितली आहे. दोषींवर कारवाई व्हावी. यावरून राजकारण करू नका, असे मी सांगतो आहे. पण विरोधक आता आमच्या फोटोला जोडे मारण्याचे आंदोलन करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या, बघतो ना, असे अजित पवार म्हणाले.
लोकसभेला जे झालं ते झालं, त्या खोलात मी जात नाही. लोकशाहीत प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण काही लोक सांगतात, दादा आता बारामतीत वेगळंच वाटतं, आता सगळे पवार घरी येत आहेत. गेल्या 25-30 वर्षांत हे कोणाच्या घरी गेले नाही. ते आता दारोदार फिरायला लागले आहेत. त्यात इकडचे आणि तिकडचे पण पवार आहेत, असे सांगत अजित पवार यांनी सभेत हंशा पिकवला.
लाडकी बहीण योजना, शेतकर्यांची वीज बिल माफी, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण, प्रशिक्षण घेणार्यांना भत्ता, तीन सिलिंडरचे अनुदान, दुधाला अनुदान अशा योजना आम्ही सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल अपप्रचार केला जात आहे. पण ही योजना बंद होणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. 1 कोटी 7 लाख महिलांना त्याचा लाभ मिळतो आहे. योजनांमध्ये कसलाही भ्रष्टाचार नाही. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर पुन्हा महायुतीचे सरकार आले पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.