Shahuwadi Smart Meter Conflict
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या सक्तीवरून महावितरण आणि वीज ग्राहकांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, काही गावांत वादाचे प्रसंग घडत आहेत. स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत ग्राहकांमध्ये असलेले गैरसमज, वाढीव वीजबिलाची भीती आणि प्रीपेड पद्धतीच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सरसकट स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ग्राहकांकडून या मोहिमेला विरोध केला जात आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिल अचानक वाढू शकते, असा समज ग्राहकांमध्ये आहे. तसेच, स्मार्ट मीटर प्रीपेड पद्धतीने कार्यरत होणार असल्यास रिचार्जची रक्कम संपल्यानंतर वीजपुरवठा आपोआप खंडित होईल, अशी भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
महावितरणकडून स्मार्ट मीटरचे फायदे, त्याची कार्यपद्धती, बिलिंगची प्रक्रिया आणि ग्राहकांवरील संभाव्य परिणाम याबाबत पुरेशी माहिती दिली जात नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे मीटर बदलण्याच्या प्रक्रियेबाबत ग्राहकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या यंत्रणेचा आर्थिक भार भविष्यात ग्राहकांवर पडेल, अशीही भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील परखंदळे, गोगवे-कापशी, सावर्डे यांसह अनेक गावांत स्मार्ट मीटर बसविण्यावरून महावितरणचे कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात वादाचे प्रसंग घडले आहेत. काही गावांत स्मार्ट मीटरला तीव्र विरोध सुरू असून, काही प्रकरणे पोलिस ठाण्यात तक्रारीपर्यंत पोहोचली आहेत.
दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थेट मीटर बदलण्याऐवजी प्रथम प्रत्येक गावात जाऊन ग्राहकांना स्मार्ट मीटरची संपूर्ण माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विशेष बैठका घेऊन ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे, तसेच स्मार्ट मीटरची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावून सांगावी, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
जुने मीटर आणि नवीन स्मार्ट मीटर काही दिवस समांतर पद्धतीने सुरू ठेवून दोन्ही मीटरच्या वीजवापराच्या नोंदी ग्राहकांना दाखवाव्यात. त्यानंतरच ग्राहकांचा विश्वास संपादन करून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही होत आहे.