

कराड : महावितरणकडून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नोटिसा देण्यात येत असून, मीटर बसविला नाही तर वीज कनेक्शन कट करण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, महावितरणने दडपशाही करू नये अन्यथा महावितरण विरोधात मोठे जनआंदोलन उभा केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. दरम्यान स्मार्ट मीटरला सार्वत्रिक विरोध होत असताना लोकप्रतिधींनी जनतेच्या या प्रश्नावर मात्र मौन बाळगल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
स्मार्ट मीटरच्या विरोधात कराड तालुक्यात यापूर्वी अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, दिग्विजय सूर्यवंशी तसेच स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीच्या माध्यमातून महावितरणच्या कराड कार्यालयावर दोन मोर्चे काढण्यात आले होते. तसेच पंचायत समिती मासिक सभेसह अनेक गावांत स्मार्ट मीटर बसवू नयेत याबाबत ग्रामसभांचे ठराव करण्यात आले आहेत. तरीही स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती सुरू आहे.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर काही ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या आहेत. काही ठिकाणी बिले तिप्पट-चौपट वाढल्याचे ग्राहक सांगत असल्याने या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर सक्तीचे नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. प्रत्यक्षात महावितरणकडून धमकीवजा नोटिसा का दिल्या जात आहेत, असा सवाल दिग्विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित केला.
वीज अधिकाऱ्यांकडून ग्राहकांची अडवणूक
रेठरे बुद्रुकच्या वाढीव भागातील सिंगल फेज वीजपुरवठ्याचा विषय अधिकाऱ्यांनी अडवून धरला आहे. नवीन वीजलाइन उभारण्यात आली असली तरी ती अद्याप कार्यान्वित झालेली नाही. स्मार्ट मीटर बसविल्यानंतरच सिंगल फेज पुरवठा सुरू केला जाईल, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला आहे.
घरात कोणी नसताना स्मार्ट मीटर बसविले..
काही ठिकाणी ग्राहकांच्या घरात कोणीही नसताना सद्याचा मीटर काढून स्मार्ट मीटर बसविल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या आहेत. काही ठिकाणी ग्राहकांनी उघड विरोध केला आहे. ग्राहकांना पूर्वसूचना न देता मीटर बदलले जात असतील, तर त्याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.