

पणजी : विधानसभेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी वीज दरवाढीच्या प्रश्नावर आणि स्मार्ट मीटरवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, देशातील कुठल्या राज्यामध्ये गोव्यापेक्षा कमी वीज दर आहे तो दाखवून द्या, त्यापेक्षाही कमी दर गोव्यात ठेवू. वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी इतर राज्यापेक्षा विजेचा दर गोव्यात कमी असल्याचे सांगितले. स्मार्ट मीटर सध्या स्थगित ठेवण्यात आले असून, घरगुती जोडणीसाठी स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत. मात्र व्यावसायिक जोडणीला स्मार्ट मीटर लावले जातील, असे नमूद केले.
आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला वाढीव वीजदर व स्मार्ट मीटरचा प्रश्न उपस्थित केला. पाच वर्षांपूर्वी ६०० रुपये वीजबिल येत होते, त्यांना आता अडीच हजारच्या आसपास बिल येत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, लोकांचे जादा घेतलेले पैसे परत करण्याची मागणी सरदेसाई यांनी केली. लोकांना मीटर निवडण्याचे अधिकार द्यावेत, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वीजबिले त्वरित कमी करण्याची मागणी करताना वीज मंत्री योग्य उत्तरे देत नसल्याचे सांगत थेट सभापतींच्या समोर आलेमाव गेले. त्यांच्या मागे इतर सर्व विरोधी आमदारही पोचले.
स्मार्ट मिटर रद्द करण्याची व वीज दर कमी करण्याची मागणी करू लागले. अशा प्रकारे एकाच प्रश्नावर दोन वेळा विरोधक सभापतींच्या समोर पोहचले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर विरोधी आमदार आपापल्या आसनावर बसले. या प्रश्नावर वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विरोधकांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र विरोधक ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत दिसले नाहीत. वीज मंत्री योग्य उत्तरे देत नसल्याचा आरोप सरदेसाई यांनीही केला.
ढवळीकर म्हणाले की, स्मार्ट मीटर योजना ही दहा वर्षांपूर्वीची आहे. अनेक राज्यांमध्ये ती चालू झालेली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात ४० ते ५० टक्के स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत. जर वीज बिल महाग दिसते तर लोकांनी पंतप्रधान मंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा पॅनल बसवून वीज बिल शून्य करावे. त्यासाठी सरकार ५० टक्के अनुदान देत असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. जे वाढीव बिलाच्या दंडाची रक्कम घेतली होती. ती ३२ कोटी परत केल्याचे ढवळीकर यांनी सांगितले
व्यक्ती इंग्लंडला राहते; पण बिल वाढले
मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, एक व्यक्ती इंग्लंडला राहत आहे. २०२१ मध्ये त्याने बिल भरले नव्हते. त्यावेळी ते १०२१ होते. त्याने गेली पाच वर्षे ते भरलेले नाही. आता ते व्याजासह वाढणार आहे. असेच लोक वीज बिले वाढल्याच्या तक्रारी करतात. लोकांनी वेळेवर बिले भरल्यास त्याना दंड भरावा लागणार नाही.
५०० युनिटच्या वर दरवाढ
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधक व वीज मंत्र्यांत चाललेला वाद संपवण्यासाठी हस्तक्षेप करत सांगितले की, सध्याच्या घडीला १०० युनिटसाठी दोन रुपये दहा पैसे दर आहे. इतर राज्यात तो चार रुपये आहे. गोव्यात ५०० युनिटच्या वर वीज वापरणाऱ्यांनाच दर वाढवला आहे. तो चार रुपये १५ पैसे आहे. इतर राज्यात सात रुपये आहे. ५०० युनिट वीज गरीब वापरत नाहीत. असे सांगून घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर बसवले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
५०० युनिटच्या वर दरवाढ
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधक व वीज मंत्र्यांत चाललेला वाद संपवण्यासाठी हस्तक्षेप करत सांगितले की, सध्याच्या घडीला १०० युनिटसाठी दोन रुपये दहा पैसे दर आहे. इतर राज्यात तो चार रुपये आहे. गोव्यात ५०० युनिटच्या वर वीज वापरणाऱ्यांनाच दर वाढवला आहे. तो चार रुपये १५ पैसे आहे. इतर राज्यात सात रुपये आहे. ५०० युनिट वीज गरीब वापरत नाहीत. असे सांगून घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर बसवले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.