कोल्हापूर

Former MLA Sanjeevanidevi Gaikwad passed away : शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यावर शोककळा; माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन...

हे वृत्त समजताच दोन्ही तालुक्यांतील राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे

पुढारी वृत्तसेवा

बांबवडे : पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आणि 'गोकुळ' दूध संघाच्या माजी संचालिका श्रीमती संजीवनीदेवी संजयसिंह गायकवाड यांच्या निधनाने शाहूवाडी व पन्हाळा या दोन्ही तालुक्यांवर शोककळा पसरली आहे. सर्वसामान्यांशी आपुलकीचे नाते जपणारे एक मातृतुल्य नेतृत्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संजीवनीदेवी यांचा जन्म शाहूवाडी तालुक्यातील सरुड येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार कै. संजयसिंह (संजयदादा) गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संजयदादा यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात संजीवनीदेवी यांनी नेहमीच खंबीर साथ दिली.

सन २००० मध्ये आमदार संजयदादा गायकवाड यांच्या अकाली निधनामुळे पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या अत्यंत दुःखाद प्रसंगात सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. आपल्या ४ वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी दोन्ही तालुक्यांत अनेक विकासात्मक आणि लोकोपयोगी कामांचा धडाका लावला.

सहकार क्षेत्र आणि सामाजिक योगदान

गोकुळ दूध संघ: तब्बल १० वर्षे त्यांनी 'गोकुळ' दूध संघाचे संचालक म्हणून यशस्वी कामकाज पाहिले. रोजगारनिर्मिती व संस्था उभारणी: सहकार क्षेत्रातील आपल्या पदाचा वापर करून त्यांनी अनेक स्थानिक संस्थांची निर्मिती केली आणि ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

कार्यकर्त्यांशी नाळ: संपन्न राजकीय वारसा असूनही अत्यंत नम्र स्वभाव आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाण्याची त्यांची पद्धत यामुळे दोन्ही तालुक्यांत त्यांचा मोठा जनसंपर्क होता.

श्रीमती संजीवनीदेवी संजयसिंह गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त समजताच दोन्ही तालुक्यांतील राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार, आप्त आणि कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT