

कोल्हापूर : जिल्ह्यातील मतदार यादीतून ४ लाख ५१ हजार मतदारांची नावे रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) झालेल्या पडताळणीतून ही नावे समोर आली आहेत. मतदार म्हणून यादीत नाव कायम ठेवण्यासाठी आवश्यक गणना अर्ज सादर करण्याचा सोमवार (दि.१७ ऑगस्ट) हा अखेरचा दिवस आहे. यामुळे अद्याप ज्यांनी गणना अर्ज दिलेला नाही, त्यांना तो उद्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे देता येणार आहे.
जिल्ह्यात सुरू असलेली एसआयआर प्रक्रिया जवळपास संपली आहे. ३ हजार ४५० बीएलओ यांच्याकडून जिल्ह्यातील ३३ लाख ५५ हजार २४४ मतदारांची पडताळणी करण्यात आली. या मतदारांना त्यांचे गणना अर्ज वाटप करण्यात आले. त्यापैकी रविवारी (दि.१६) सायंकाळच्या आकडेवारीनुसार तब्बल ४ लाख ५१ हजार १८२ मतदारांचे गणना अर्ज भरून आले नाहीत. हे मतदार मयत, दुबार आणि स्थलांतरित असल्याची शक्यता आहे. ज्यांचे अर्ज आले नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत.