परळे निनाई (ता. शाहुवाडी) येथील कडवी मध्यम प्रकल्पात शिल्लक असलेला पाणीसाठा Pudhari
कोल्हापूर

Kadvi Dam | कडवी मध्यम प्रकल्पात ५६ टक्के पाणीसाठा; २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

​उन्हाळ्यात शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार

पुढारी वृत्तसेवा

Kadvi Irrigation Project water storage

सुभाष पाटील

विशाळगड : शाहुवाडी तालुक्यातील परळे निनाई ते पाटणे दरम्यानच्या २२ गावांसाठी 'जीवनदायिनी' ठरलेल्या कडवी मध्यम प्रकल्पात यंदा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. आजमितीला धरणात ५५.९९ टक्के साठा शिल्लक आहे. धरणातून २०० क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात सुरू आहे. धरण प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे यावर्षी परिसरात पाणीटंचाई भासणार नाही, अशी माहिती शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली आहे.

कडवी धरणाची एकूण साठवण क्षमता २.५१ टीएमसी (७१.२४० दलघमी) असून सद्यस्थितीला त्यात १.४० टीएमसी (३९.५१ दलघमी) उपयुक्त साठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी १.६२ टीएमसी साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत साठा किंचित कमी असला, तरी पावसाळ्यापर्यंतची गरज भागवण्यासाठी तो पुरेसा आहे. धरणाची सध्याची पाणी पातळी ५९३.७९ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.

या प्रकल्पातून केवळ २२ गावेच नव्हे, तर मलकापूर नगरपालिका आणि उदय साखर कारखान्यालाही पाणीपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी दरमहा १० ते १२ टक्के पाणी लागते. वालूर, सुतारवाडी, येलूर, भोसलेवाडी, शिरगाव, कोपार्डे, पाटणे आणि सवते-सावर्डे या आठ ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणी साठवणूक अधिक प्रभावी झाली आहे. विशेष म्हणजे, आजवर या धरणातील साठा कधीही शून्यावर गेलेला नाही.

​या २२ गावांना धरणाचा लाभ (लाभार्थी गावे) :

परळे निनाई, भेंडवडे, लोळाणे, पुसार्ळे, आळतूर, करूंगळे, वालूर, निळे, कडवे, येलूर, पेरीड, गाडेवाडी, मलकापूर, कोपार्डे, शिरगाव, सांबू, मोळवडे, सावर्डे, सवते, सावे, पाटणे आणि शिंपे.

धरणाची सद्यस्थिती:

​ एकूण क्षमता: २.५१ टीएमसी (७१.२४० दलघमी)

​ चालू पाणीसाठा: १.४० टीएमसी (३९.५१ दलघमी)

​ पाणी पातळी: ५९३.७९ मीटर

प्रकल्पातील पाणी पातळी सध्या समाधानकारक असली, तरी भविष्यातील गरजा लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने करावा.
— खंडेराव गाडे, शाखा अभियंता, कडवी धरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT