Kolhapur water scarcity | जिल्ह्यातील 163 गावांच्या नशिबी नेहमीच कोरड

17 धरणांच्या पाणीदार जिल्ह्यात महिलांच्या डोक्यावरील हंडा हटणार तरी कधी?
Kolhapur water scarcity
Kolhapur water scarcity | जिल्ह्यातील 163 गावांच्या नशिबी नेहमीच कोरड
Published on
Updated on

प्रवीण ढोणे

राशिवडे : कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुक्यांमध्ये 1212 गावांसाठी 15 प्रमुख धरणे व दोन लघुप्रकल्प अशी 17 प्रकल्पाची सरकारी दप्तरी नोंद आहेत; तर 3425 सार्वजनिक विहिरी असूनही भौगोलिक कारणांमुळे 65 गावे व 98 वाड्या अशी 163 गावे, वाड्यांवर नेहमीच पाणीटंचाईचे सावट असते. घराघरांमध्ये पाणी मिळावे यासाठी राबविली जाणारी जलजीवन योजनाही कुचकामी ठरत असल्याने पाणीदार जिल्ह्यातील या गावांना पाणी पाणी म्हणावे लागते हे दुर्दैव आहे.

जिल्ह्यात राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी, पाटगाव, वारणा, कडवी, चिकोत्रा, जांबरे, कासारी यासह आदी 17 धरणे आहेत. 2025च्या स्थितीनुसार 163 गावांवर पाणी टंचाईचे संकट असते. जिल्ह्यात सरासरी 1900 ते 2200 मि.मी. पाऊस पडतो. पावसाळ्यात सुमारे 532 टीएमसी पाणी उपलब्ध होते. यापैकी 99.64 टीएमसी पाणी 17 धरणांमध्ये साठविले जाते. यामधील शेतीसाठी 70 ते 75 टीएमसी पाणी लागते तर पिण्यासाठी वार्षिक 3.5 ते 5 टीएमसी पाणी लागते. यामध्ये कोल्हापूर शहरासाठी 2 ते 2.5 टीएमसी तर ग्रामीण भागासाठी 1.5 ते 2.5 टीएमसी पाणी लागते. भौगोलिक कारणांमुळे चंदगड तालुक्यातील अनेक गावे, वाफ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गडहिंग्लज, हातकणंगले तालुक्यात मध्यम स्वरूपाच्या दुष्काळास सामोरे जावे लागते.

जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार्‍या गगनबावडा तालुक्यातील 9 गावे, 21 वाड्या, राधानगरी तालुक्यातील गावे व वाड्या आठ, आजरा तालुक्यातील 6 गावे, 12 वाड्या, भुदरगड तालुक्यातील 11 गावे, 23 वाड्या, गडहिंग्लज तालुक्यातील 13 गावे, 3 वाड्या तर हातकणंगले तालुक्यातील 7 गावे, 13 वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सरकारी नोंद असणार्‍या 3425 सार्वजनिक विहिरी उन्हाळ्यात दुर्बीण घेऊनच शोधाव्या लागतात, ही वस्तुस्थिती आहे. घराघरांमध्ये मुबलक पाणी मिळावे या हेतूने सुरू केलेली जलजीवन योजनांमुळे पाणी मिळणे लांबच, पण नागरिकांचे जीवनच हलाखीचे बनले आहे.

प्रामुख्याने जिल्ह्यामधील धरणे व सार्वजनिक विहिरींसह मुबलक पाऊस असूनही भौगौलिक रचना व अन्य कारणांमुळे ही गावे, वाड्यांमध्ये पाणीटंचाई गंभीर असते. प्रसंगी विहिरी, झरे आटल्यामुळे सरकारला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. त्यामुळे पाणीदार धरणांचा जिल्हा कधी पाणीटंचाईमुक्त होणार याचे उत्तर लोकप्रतिनिधीच देतील हे मात्र खरे.

पंचगंगा जलपर्णी, गटारगंगा

सध्या पंचगंगा नदीला जलपर्णीने वेढले आहे. ही नदी नव्हे तर गटारगंगा आहे की काय, असा भास होणे साहजिकच आहे. नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतावर केलेले अतिक्रमण गावोगावच्या तलावापर्यंत येऊन पोहचले आहे. त्यामुळे साहजिकच सर्वत्र शुद्ध पाण्याच्या गटारगंगा होऊ लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news