

बाबासो राजमाने
इचलकरंजी : वाहनांच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने वाहन तपासणी प्रक्रिया अधिक आधुनिक आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) इचलकरंजी अंतर्गत अत्याधुनिक ऑटोमेटेड वाहन फिटनेस सेंटर उभारण्यास शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पासाठी माणगाववाडी परिसरात जागा निश्चित केली आहे. त्यासाठी सुमारे 15.34 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
वाढत्या नागरीकरणाबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. माल वाहतूक आणि प्रवासी वाहनांची संख्या मोठी आहे. ट्रक, बस, टेम्पो, रिक्षा यांसारख्या व्यावसायिक वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा वाहनांची नियमित वैज्ञानिक पद्धतीने तपासणी होणे गरजेचे आहे. आधुनिक तपासणी केंद्र उपलब्ध झाल्यामुळे वाहनधारकांचा वेळ आणि खर्चही बचत होणार आहे. सध्या अनेक ठिकाणी वाहनांचा फिटनेस तपासणी पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. अचूकतेबाबतही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे ऑटोमेटेड फिटनेस सेंटरची नितांत गरज आहे. त्यामुळे माणगाववाडी येथे जागा निश्चित करून 15.34 कोटींच्या प्रस्तावाचा पाठपुरावा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी केला. ऑटोमेटेड वाहन तपासणीला मंजुरी मिळाल्याने वाहनातील तांत्रिक दोष अचूकपणे ओळखून वेळ आणि खर्चाचीही बचत होणार आहे. येथे देशातील कोणतेही वाहन तपासणी करता येणार आहे.