बाबासो कुंभार यांनी रासायनिक खतांना फाटा देत सेंद्रिय शेतीतून भात मळा फुलवला (Pudhari File Photo)
कोल्हापूर

Organic Rice Farming Shahuwadi | शाहूवाडीच्या निळ्यात फुलला 'सेंद्रिय भात मळा'

बाबासो कुंभार यांनी रासायनिक खतांना फाटा देत सेंद्रिय शेतीतून साधला नवा आदर्श

पुढारी वृत्तसेवा

सुभाष पाटील

विशाळगड : रासायनिक खतांचा वाढता वापर, त्यामुळे जमिनीची होणारी धूप आणि वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक भार... या दुहेरी संकटावर मात करत ​निळे, ता. शाहूवाडी येथील शेतकरी बाबासो कुंभार यांनी सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. त्यांनी केवळ सेंद्रिय खतांचा वापर करून भाताचा ‘सेंद्रिय मळा फुलला’ असून, यासोबतच मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब करत शेती आणि दुग्ध व्यवसाय यांची सांगड घालून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

स्लरीचा वापर, जमिनीचा पोत सुधारला

बाबासो कुंभार यांनी त्यांच्या गोठ्याजवळच ६० हजार लिटर क्षमतेची टाकी बांधली आहे. यामध्ये जनावरांच्या शेण आणि गोमूत्रापासून तयार होणारी स्लरी जमा होते. या स्लरीचा वापर करण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. मोटार आणि मड पंपाच्या साहाय्याने ही स्लरी थेट शेतात सोडली जाते. यामुळे कमी वेळेत, कमी मनुष्यबळात संपूर्ण शेतात स्लरी पसरवणे शक्य झाले. या स्लरीच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारला असून, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे त्यांची पिके इतर शेतातील पिकांपेक्षा अधिक हिरवीगार आणि टवटवीत दिसत आहेत.

'सेंद्रिय शेती काळाची गरज'

​ आपल्या या यशस्वी प्रयोगाबद्दल बोलताना बाबासो कुंभार म्हणाले, "गेले पाच वर्षांपासून मी गोठा व्यवस्थापन करत आहे. यामुळे मला सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक खते घरच्या घरीच उपलब्ध होत आहेत. रासायनिक खतांमुळे जमिनीची धूप होते, पण सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढते. प्रत्येक शेतकऱ्याने शेण आणि गोमूत्राचा योग्य वापर केल्यास तो घरच्या घरीच उत्तम दर्जाचे खत तयार करू शकतो."

बाबासो कुंभार यांच्या शेतातून चालताना जमिनीतील माती अतिशय मुलायम जाणवते. मातीतील गांडुळांची संख्या वाढली असून, जमिनीचा पोत भुसभुशीत झाल्याचे दिसून येते. त्यांचे पीक हिरवेगार असून, हे सर्व त्यांच्या सेंद्रिय शेतीच्या यशस्वी प्रयोगाचेच द्योतक आहे.

​ कुटुंबाची मोलाची साथ

​ बाबासो कुंभार यांच्या या यशस्वी वाटचालीत त्यांच्या कुटुंबीयांचीही मोलाची साथ मिळाली आहे. योग्य नियोजन, जनावरांची काळजी आणि गोठा व्यवस्थापनात कुटुंबातील प्रत्येक सदस्य मदत करतो. शेती आणि दुग्ध व्यवसाय यांची सांगड घालून, बाबासो कुंभार यांनी सेंद्रिय शेतीतून विक्रमी उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT