Service spirit is important in medical field while accepting modernity
दै. ‘पुढारी’ व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आयोजित व्याख्यानाला केशवराव भोसले नाट्यगृहात झालेली गर्दी. व्याख्यान देताना डॉ. संजय ओक.  Pudhari File Photo
कोल्हापूर

आधुनिकता स्वीकारताना वैद्यकीय क्षेत्रात सेवाभाव महत्त्वाचा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स यासारख्या तंत्रज्ञानाने मोठे बदल होत आहेत. बदल होत असले, तरी सेवाभाव हा वैद्यकीय व्यवसायाचा आत्मा आणि श्वास आहे. वैद्यकीय व्यवसायाची पालखी स्थित्यंतरातून जात असली, तरी सेवाभाव हा पालखीतील देव आहे आणि त्याच्या दर्शनासाठीच लोक येत असतात, याचा विसर पडू नये. आपण त्या पालखीचे भोई आहोत, ही भावना वैद्यकीय क्षेत्राने कायम जपली पाहिजे, असा सल्ला ख्यातनाम बालरोग शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांनी दिला. वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले बदल अकल्पित आहेत म्हणून भयावह आहे; परंतु हे बदल अपरिहार्य आहेत, त्यामुळे ते समजून स्वीकारले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

दै. ‘पुढारी’ आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘वैद्यकीय विश्वातील बदल’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हे व्याख्यान संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाले. रुग्ण हा केवळ एक रुग्ण नाही, तर तो एक माणूस आहे, ही डॉक्टरांची भूमिका असली पाहिजे. रुग्णांकडे पाहण्याची डॉक्टरची द़ृष्टी ही भावनिकदेखील असायला हवी. भावनाशील असणे ही डॉक्टरची कमजोरी नाही, तर ते त्यांचे बलस्थान आहे हे विसरून चालणार नाही, असे डॉ. ओक म्हणाले.

रोबोटिक्स आणि एआयचा वापर वाढणार

रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. पुढे होणार्‍या आजारांचे भाकीत करण्याची मोठी क्षमता एआय तंत्रज्ञानामध्ये आहे. एआय हा पॅटर्न ओळखतो, त्यामुळे भविष्यात होणार्‍या आजारांचे भाकीत करण्याची क्षमता वैद्यकीय क्षेत्रात विकसित होणार आहे. शिवाय विविध आजारांत मशिन लर्निंगचा मोठा उपयोग होत आहे. कोविड काळात फुफ्फुसाच्या बाहेरच्या बाजूकडे असलेल्या पॅचेसची तीव-ता समजण्यासाठी एआयचा मोठा उपयोग झाला. हेड अँड नेक कॅन्सरसारख्या आजाराची तीव-ता आणि त्यानुसार उपचारासाठी अवलंबण्याची उपचार प्रणाली याचा मेळ घालता येणे शक्य झाले, असे सांगून डॉ. ओक म्हणाले, भविष्यात एआयच्या वापर असलेली अंगावर घालण्याची विविध गॅझेटस्देखील मानवी जीवनाचा भाग असणार आहेत. रक्तातील साखर, हृदयाची स्पंदने यांचे 24 तास मॉनिटरिंग करून रुग्णाला वैद्यकीय सल्ला देण्याचे काम ही गॅझेटस् करतील. मधुमेहाच्या रुग्णांच्या साखरेच्या पातळीचे संकेत रुग्णाला वेळोवेळी मिळत राहतील. त्यामुळे रुग्णाला कोणते पदार्थ खाता येतील, ते किती प्रमाणात खाल्ले तर चालतील, याचा अचूक निर्णय घेता येणार आहे.

एआयचा मोठा परिणाम वैद्यकीय क्षेत्रात होत आहे. येत्या काळात बदलाचा वेग आणखी वाढणार आहे. आता एआय डॉक्टरांची जागा घेईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मग डॉक्टरांचे काय होणार? याला एकच उत्तर आहे. जे डॉक्टर एआयला आत्मसात करतील तेच प्रवाहात टिकून राहतील, असे डॉ. ओक म्हणाले.

डॉक्टर-रुग्ण संवाद जपा

डॉ. ओक म्हणाले, आधुनिक वैद्यकीय व्यवसायात डॉक्टर आणि रुग्णांमधील संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे रुग्णांच्या डॉक्टरवरील विश्वासाची जागा वैफल्याने घेतली आहे. डॉक्टरांनी रुग्णाचे निदान, त्यावरील उपचार पद्धती, वैद्यकीय खर्च याबाबतची माहिती रुग्ण आणि नातेवाईकांना समजून सांगितली पाहिजे. ती माहिती त्यांना समजली आहे की नाही, याची खातरजमा करावी. त्यांच्या शंकांचे निरसन करावे, कारण रुग्णांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्याची उत्तरे देण्याचे सौजन्य डॉक्टरने दाखवले पाहिजे. हा संवाद होत नाही. त्यामुळे सेकंड ओपिनियनचे प्रमाण वाढते. खरे तर त्यासाठी वेळ, खर्च आणि मनःस्ताप वाढतो. हे सर्व टाळायचे असेल तर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात संवादाचे नातेसंबंध कायम राहिले पाहिजेत.

ती त्यावेळची गरज

कोव्हिड व्हॅक्सिनमुळे होणारे दुष्परिणाम ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. रक्त घट्ट होण्याचे प्रमाण, मेंदूचे विकार, खुब्याच्या सांधा निकामी होण्याचे प्रकार अपवादात्मकरीत्या घडत आहेत. म्हणून लसीकरण करणे चुकीचे होते असे होत नाही. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते; मात्र जास्तीत जास्त प्राण वाचवणे ही त्यावेळची गरज होती. सार्वजनिक हिताचा विचार करता लसीकरण करणे हा योग्य निर्णय होता; कारण लसीकरणामुळे कोरोना अटोक्यात आला आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले ही वस्तुसस्थिती आहे, असे सांगून डॉ. ओक म्हणाले. 9 महिन्यांत भारताने दोन कोरोना व्हॅक्सिन विकसित केल्या. ही आत्मनिर्भर भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोव्हिडवर पूर्णपणे नियंत्रण आलेले नाही. आजही कोव्हिडचे रुग्ण आढळतात; पण कोव्हिडवर उपचार कसे करायचे, याचे परिपूर्ण ज्ञान आता वैद्यकीय क्षेत्राला प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोव्हिडची तीव-ता आणि संसर्गाचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे.

छोट्या शहरांतही मल्टिस्पेशालिटी उपचार

बदलत्या काळात कॉर्पोरेट मल्टिस्पेशालिटीचा विस्तार गतीने होणार आहे. पूर्वी महानगरांमध्ये असलेल्या या रुग्णालयांची साखळी आता छोटी शहरे आणि नंतर ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे चांगल्या उपचारांसाठी महानगरातील रुग्णालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. स्थानिक पातळीवर त्याच दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आता उपलब्ध झाल्या आहेत. कॉर्पोरेट रुग्णांलयांचे व्यवस्थापन डॉक्टरने करणे गरजेचे आहे. व्यावसायिक व्यवस्थापनापेक्षा डॉक्टरांना रुग्णांच्या हिताची जास्त कळकळ असते. गुंतवणुकीवर येणारा परतावा ही संकल्पना वैद्यकीय व्यवसायात वेगळी असते. आर्थिक नफ्याबरोबर बरे होऊन जाणार्‍या रुग्णाच्या डोळ्यांतील कृतज्ञतेचे अश्रू हा परतावाच असतो, असेही डॉ. ओक म्हणाले.

आरोग्य विमा क्षेत्रावर नियमन आणि नियंत्रणाची गरज

खासगी विमा कंपन्या आरोग्य विमा विकताना रुग्णांना अनेक बाबतीत अंधारात ठेवतात. त्यांना ज्यावेळी गरज पडते, त्यावेळी वेगवेगळी कारणे देऊन विमा नाकारला जातो. असे प्रकार होऊ नयेत म्हणून या कंपन्यांवर शासनाचे नियंत्रण आणि नियमन आवश्यक आहे. ही संकल्पना समाजात सर्व स्तरावर रुजली पाहिजे. सदस्यांची संख्या आणि पॉलिसीची रक्कम वाढली पाहिजे.

शस्त्रक्रिया हा माझा श्वास

माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी ऑपरेशन थियटरमध्येच होते. शस्त्रक्रिया नसेल तर मला अस्वस्थ वाटते. शस्त्रक्रिया करणे हा माझा श्वास आहे. रविवारी आमचे पथक ग्रामीण भागात शस्त्रक्रियेचे शिबीर घेतात. ज्यांना वैद्यकीय उपचार परवडत नाहीत अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. याच्यासाठीचा निधी समाजातील दानशूर लोक, सीएसआर फंड यातून उभा करतो. या उपक्रमांतर्गत वर्षाला 800 ते 1200 शस्त्रक्रिया करतो, असे ते म्हणाले.

कोविडने बरेच शिकवले

कोरोना महामारीच्या काळात राज्याच्या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असताना चार वेळा चार व्हेरियंटची लागण झाली. त्यावेळी 10 दिवस आयसीयुमध्ये होतो. तेंव्हा नातू, मुलगा आणि आख्खं कुटुंब माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. यावेळी आयसीयुमधील पेशंट आणि नातेवाईकांमधील संवाद असणे किती गरजेचे आहे याची मला जाणीव झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी बोलून व्हीडीओ कॉलद्वारे बोलण्याची सोय करण्याची सुचना केली. मी सर्जन व्हावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती, एवढ्या अनुभवानंतर कुणी मला विचारलं की पुढच्या जन्मी काय व्हायचेय, मला पुढच्या जन्मी देखील डॉक्टरच होऊन वैद्यकीय व्यवसायाच्या पालखीचे भोई व्हायला आवडेल हेच माझे उत्तर असेल, असे डॉ. ओक यांनी सांगितले.

जेनरीक औषधे दुय्यम असतात ही आवई

जेनेरीक औषधे ही चांगल्या दर्जाचीच असतात. पण ही औषधे दुय्यम दर्जाची असतात ही काही लोकांना पसरवलेली आवई आहे. जेनरीक औषधात वापरलेला औषधांचा मॉल्युक्युल एकच असतो. आमच्या घरात 2800 रुपयांची औषधे लागत. तीच जेनेरीक घेतली तर 700 रुपयात मिळू लागली. त्याचा परिणाम सारखाच असतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. त्यांनी जेनरिक औषधे हा पर्याय जरूर घ्यावा, असा सल्लाही डॉ. ओक यांनी दिला.

डायलिसीस युनिटसाठी व्यक्तीगत मदत करू डायलिसीसची गरज आणि युनिटची उपलब्धता यात मोठी तफावत आहे. सामाजिक संस्था, ट्रस्ट, दानशुर व्यक्तींनी यासाठी पुढे येण्याची गरज आहे. या क्षेत्रातला माझ्या दीर्घ अनुभवाचा उपयोग करून या युनिट्सच्या उभारणीसाठी व्यक्तिगत मदतीचा हात देण्याची ग्वाही डॉ. ओक यांनी यावेळी दिली. प्रश्नोत्तराच्या सत्रात एका श्रोत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांना डॉ. ओक यांनी समर्पक उत्तरे दिली.

तत्पूर्वी दै. पुढारीचे संस्थापक संपादक पद्मश्री ग.गो. जाधव आणि संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून व रोपाला पाणी घालून डॉ. ओक यांच्या हस्ते कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ मेंदू तज्ज्ञ डॉ. नंदकुमार जोशी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, दै. पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, डॉ. बी. पी. साबळे, प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील, डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. चंद्रकांत माने, डॉ. बिमल तिवडे आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी प्रास्ताविक तर पंडीत कंदले यांनी सूत्रसंचालन केले.

एका रक्ताच्या थेंबात सर्व तपासण्या

रक्ताच्या तपासण्या करण्याच्या पद्धतीत तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र्र बदल होत आहे. पूर्वीसारखे सीरिंज भरून रक्त काढून घेण्याची आता गरज असणार नाही. रुग्णाच्या शरीरातील रक्ताच्या एका थेंबावरून सर्व प्रकारच्या तपासण्या काही सेकंदांत करता येणे शक्य झाले आहे. याचा रिपोर्ट ओपीडी व रुग्णाच्या वेबसाईडला स्क्रीनवर तत्काळ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वेळेत आणि योग्य उपचार करणे सोयीचे होणार आहे, असे डॉ. ओक म्हणाले.

SCROLL FOR NEXT